रघुनाथराव, तुमचे दुसरे नाव स्वाभिमान!

फोंडा येथील 'राजीव गांधी कला मंदिरा'च्या नवनियुक्त समितीच्या स्थापनेनंतर घडलेल्या घडामोडींनी गोव्याच्या सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठे वादळ उठवले आहे. स्वार्थ आणि राजकीय पुनर्वसनाच्या या भाऊगर्दीत, गोव्यातील आघाडीचे कलाकार रघुनाथ साकोर्डेकर यांनी समितीच्या सदस्यपदाचा दिलेला तडाखेबंद राजीनामा हा केवळ एका पदाचा त्याग नसून, कलाक्षेत्रातील स्वाभिमान आणि निष्ठेचा एक प्रखर हुंकार आहे.

Story: विशेष |
02nd August, 11:28 pm
रघुनाथराव, तुमचे दुसरे नाव स्वाभिमान!

माझ्या मते रघुनाथ साकोर्डेकर हे आजच्या घडीचे गोव्यातील आघाडीचे अभिनेते असून कित्येक कोकणी-मराठी नाट्यकृतींमधील उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. अभिनय आणि आवाज, टायमिंग आणि अभिनयाची प्रखर जाणीव, समयसुचकता आणि बारकावे, अभ्यास आणि साधना त्यांच्या ठायी ठासून भरलेली आहे; म्हणूनच ते आजच्या घडीचे आघाडीचे कलाकार ठरतात. मुद्दाम त्यांच्याविषयी लिहिण्याचे कारण म्हणजे काल-परवाच ही खाली दिलेली बातमी वाचली आणि सत्य-असत्याची पारख करणारी रघुनाथ साकोर्डेकरांसारखी स्वाभिमानी माणसे अजूनही आहेत, म्हणून मनाला समाधान वाटले.

काय बरे आहे त्या बातमीत? त्याविषयी थोडेफार समजून घेण्यासाठी हा एकूण खटाटोप. त्या बातमीप्रमाणे, रघुनाथ साकोर्डेकर यांनी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिराच्या, सरकारने नेमणूक केलेल्या समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. आजच्या जमान्यात असे होऊ शकते, यावर सुरुवातीला विश्वास ठेवणे जरा जडच गेले म्हणा खरे तर. तरीसुद्धा त्या बातमीच्या खोलात जाऊन थोडे निरीक्षण करावे असे वाटल्याने त्याविषयी लिहिणे क्रमप्राप्त झाले.

आजकाल आपणास सरकारने एखाद्या समितीत सदस्य म्हणून सामावून घेतल्यानंतर कित्येकांना 'आभाळ ठेंगणे' झाल्यासारखे वाटते. पण रघुनाथांसारख्या काही व्यक्ती याविषयी अपवाद ठरतात. समितीच्या सदस्यपदाचा रघुनाथ यांनी दिलेला राजीनामा हादेखील अपवादाचाच एक भाग आहे, असेच मी म्हणेन.

समितीत इतरांसह आपली झालेली नेमणूक पाहून समाधान होण्याऐवजी का बरे त्यांना वाईट वाटले असेल? त्यांना राजीनामा देण्याच्या निर्णयाप्रत का बरे यावे लागले असेल? आश्चर्यच आहे बुवा! काही माणसे थंड डोक्याने काही योग्य निर्णय घेतात. रघुनाथ यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हादेखील त्यातलाच एक भाग आहे, असे मला वाटते.

१. समितीतील इतर सदस्यांची निवड करताना सरकारने आपली तुलना कोणाशी केली असावी, हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असेल का?

२. तिथे तर सगळेच लोक सत्तारूढ राजकीय पक्षाचे समर्थक असलेले सदस्य म्हणून आलेले... आणि आपण? आपण तर सत्तारूढ पक्षाचे समर्थकही नाही आहोत; तरीसुद्धा... असेही त्यांना वाटले असेल का?

३. त्यांच्यासह नितीन कोलवेकर आणि अशोक नाईक असे एकूण तीन कलाकार हे बिगर राजकीय पक्षाचे; तर इतर सदस्यांची वर्णने खालीलप्रमाणे आहेत, म्हणूनच का त्यांनी राजीनामा दिला?

अध्यक्ष : राजकीय तर आहेतच, पण अशा राजकीय नौटंकीत ते प्रथम. 

उपाध्यक्ष - माजी जिल्हा पंचायत सदस्य - त्यांची सोय कुठेतरी करावी या एकाच इराद्याने झाली आहे, म्हणून ते. एक सदस्य फोंडा नगरपालिकेचा नगरसेवक, दुसरा सदस्य माजी सरपंच, तिसरा सदस्य माजी पंच, आणखी एक सदस्य बागायतदार, एक जण सत्ताधारी पक्षाच्या इच्छुक उमेदवाराखाली एका कंपनीत काम करायचा म्हणून तो (आपण या समितीवर कसा काय पोहोचलो बुवा, हे त्यांच्यासाठी जगातील आठवे आश्चर्य, पण त्यांनी हे समजूनसुद्धा अजूनपर्यंत राजीनामा दिलेला नाही, हे आमच्यासाठी नववे आश्चर्य म्हणावे लागेल!) 

एक तरी ख्रिश्चन माणूस सदस्य म्हणून पाहिजेच या एकमेव कारणास्तव आणि तो जर नकलाकार असून या सत्तारूढ पक्षाचा समर्थक असेल, तसेच समाजसेवक म्हणून स्वतःचे बिरुद लावून मिरवत असल्यास तो सदस्य म्हणून पात्र ठरणे म्हणजे दुग्धशर्करा योगच ठरावा. म्हणून तो एक सदस्य!

फोंडा तालुक्यातील कलाकारांच्या खाणीत एखाद्या पंचायतीचा एखादा पंच (आजी किंवा माजी), एखादा नगरसेवक (आजी किंवा माजी), नकलाकार आणि कलाकार यांचे इथे झालेले हे 'खतखते' (सणासुदीला गोवेकरांच्या जेवणातील एक खास स्वादिष्ट खाद्य प्रकार)!

मूळ विषय काय असावा बरे? नाव 'कला मंदिर' = कला = art, मंदिर = Temple. या कलेच्या मंदिरात पुजारी - अध्यक्ष, उपाध्यक्ष - अभिषेकाच्या पावत्या फाडणारा, सदस्य : १. फुले वेचणारा, २. फुलांच्या माळा गुंफणारा, ३. फूल विक्रेता, ४. उदबत्ती विक्रेता, ५. नारळ विक्रेता, एक जण ओटीच्या साहित्याचा विक्रेता, तर दुसरा हार विक्रेता. 'इथे, तिथे अन् भिते' यांचा मिलाफ या एकूण समितीत झालेला दिसत आहे. म्हणूनच तर माजी पंच, माजी सरपंच, माजी झेडपी, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, इच्छुक उमेदवारांचा रतीब... कला मंदिराच्या समितीच्या बैठका म्हणजे ग्रामपंचायतीने बोलावलेली ग्रामसभाच म्हणा ना! आणि अध्यक्षांचे आगमन म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांची रणधुमाळीच! प्रत्येक कार्यकर्त्यास एक बटाटावडा, चहा, रू. ५००/-, कुरकुरी, गरजेनुसार गरजवंताला गुटखा आणि तशी सरबराई (फेणी/हुर्राक/बीयर/व्हिस्की), तसेच सादर‌ होणाऱ्या कुठल्याही नाटकाचे फ्री पास!

अशा या कला मंदिरातील मा. दत्ताराम सभागृहातील आजच्या बैठकीच्या नाटकाचा तिसरा आणि शेवटचा अंक इथेच संपतो आहे. आता नाटक (बैठक) संपताच सर्व लोक - राजकीय कलाकार, ध्वनीमुद्रक, वेषभूषाकार, स्टेजवाले आणि इतर प्रेक्षकांसह घरी! एकूण काय? फोंडा तालुक्याच्या (फोंडांत) कलेच्या मंदिरात कलेचे तळभंजण! इथे फोंडा (@अंत्रूज) तालुक्यातील खऱ्या कलाकारांविरहित हे चालते-बोलते नाटक राजकीय अभिनयसम्राटासह इथेच संपले खरे; पण नकलाकारांना मात्र लवकरच सुगीचे दिवस येतील, हे मात्र नक्की. कारण इथे '२०२७ चे महानाट्य' लवकरच सादर केले जाईल.

अशा वातावरणात रघुनाथ साकोर्डेकरांसारखा प्रामाणिक आणि नैसर्गिक प्रतिभा लाभलेला कलाकार का आणि कसा म्हणून या समितीत राहून काम करेल बरे?

राजीनाम्यास तर्क असावा तर असा. रघुनाथराव, तुमच्या स्वाभिमानाला वंदन तर आहेच, पण तुमच्या या निर्णयास सलाम!

- प्रकाश द. नाईक, (८७९६८४३५६४)