गोवा हे भारताच्या पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टीवर वसलेले निसर्ग संपन्न राज्य असून, आज देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेले आहे. गोव्याचा हा लौकिक राखून ठेवण्यासाठी इथल्या सह्याद्रीतील पर्वतराजींना अधिकाधिक संरक्षित ठेवणे गरजेचे असताना, गेल्या काही वर्षांपासून आपले सत्ताधारी पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्राखाली येणाऱ्या प्रस्तावित गावांची संख्या कमी करण्यास प्रारंभी प्रयत्नशील होते. सहाव्या वेळेला पर्यावरणीय संवेदनाक्षम गावांचा मसुदा जाहीर झाला, तेव्हा गोवा सरकारने प्रस्तावित गावांतील काही गावे वगळून, त्याजागी नवीन गावे समाविष्ट करण्याचा आपला प्रस्ताव पाठवला होता. परंतु नव्या मसुद्यात त्याला मान्यता दिलेली नाही. गोव्यातील जनतेच्या वर्तमान आणि भविष्याचे हित राखण्यासाठी पुन्हा एकदा पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्राचा जो सुधारित मसुदा जाहीर केलेला आहे, त्यात सत्तरीतील ६३, सांगेतील २६, धारबांदोडातील १३, काणकोणातील ५ आणि फोंड्यातील एका गावाचा म्हणजे राज्यातील एकूण १०८ गावांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे गोव्याच्या पेयजल, सिंचनाचे आणि प्राणवायूचे स्रोत यांचे संरक्षण होण्याबरोबर राज्याच्या शाश्वत विकासाला सेंद्रीय शेती आणि बागायती, स्वदेशी गोवंश पालन आणि दुग्ध व्यवसाय त्याचप्रमाणे पारंपरिक उद्योग, धंदे आणि निसर्ग आणि पर्यावरणस्नेही पर्यटन व्यवसायाला चालना देणे शक्य होईल. परंतु असे असताना पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्रासंदर्भात संबंधित लोकांत संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
आजच्या घडीला गोव्यात एका बाजूला गृहनिर्माण वसाहती आणि सिमेंट काँक्रिटच्या प्रकल्पांना पर्यटनाच्या नावाखाली विरोध केला जात आहे; तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत जल, जंगल, जमीन आणि जैविक संपदा यांच्या संवर्धन आणि संरक्षणाची आपसूक संधी मिळत असताना, या प्रस्तावाला मात्र विरोध केला जात आहे. सत्तरी, उत्तर गोवा जिल्ह्यातील एकेकाळी ७८ टक्के म्हणजेच सर्वाधिक वनक्षेत्र असलेला तालुका असला, तरी गेल्या पाव शतकापासून प्रारंभी पाम वृक्ष, अकेशिया आणि युकालिप्टस आदी आणि त्यानंतर ब्राझिलहून आलेली काजूची झाडे लावल्याने, वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास संकटग्रस्त झालेला आहे. त्यामुळेच काजूच्या बोंडूच्या लालसेने गवे लोकवस्तीकडे येत असतात. दारूसाठी बोंडूचा रस काढल्यानंतर, त्याचा चोथा खाण्यासाठी उंदीर येतात आणि उंदरांना भक्षण करण्यास 'धामण' (दिवड) साप लोकवस्तीकडे वळलेला असून आणि धामण हे आवडीचे खाद्य असल्याने 'भूजंग' लोकवस्ती आणि बागायती क्षेत्राकडे वळू लागलेले आहेत. सत्तरी आणि परिसरात एकट्या प्रदीप गवंडळकर यांनी चार वर्षात ९१ भूजंग साप पकडलेले आहेत. सुमारे ५०० च्या आसपास भूजंग गेल्या दशकभरात पकडलेले आहेत. 'रसेल व्हायपर'सारखा सापही आता काजू बागायती क्षेत्रात आढळू लागलेले आहेत. आज मोठ्या प्रमाणात म्हादई अभयारण्य, राखीव वनक्षेत्राची नासधूस करून काजू बागायती निर्माण होऊन, वनक्षेत्र मोठ्या संकटात आहे. एकूण ४९० चौरस किलोमीटर सत्तरीचे क्षेत्र असून, त्यातील २०८ चौरस किमी म्हादई अभयारण्य अधिसूचित झालेले असताना, ते बहुतांश संरक्षित ठेवण्यासाठी गोवा सरकारचे वन खाते अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे सत्तरीत २००९ ते २०२० या दशकभरात पाच वाघांचा मृत्यू होऊनही, आजही वाघांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवण्यासाठी गोव्याचे वन खाते अपयशी ठरलेले आहे. ५ वाघांची निघृणरित्या हत्या करूनही, गुन्हेगारांना शिक्षा देण्यास वन खाते सपशेल अपयशी ठरलेले आहे, ही वेदनादायक बाब आहे. आज पर्यावरणीय पर्यटनाच्या नावाखाली सत्तरीतील धबधब्यांच्या परिसरात जो धुडगूस चालू आहे, त्याने ध्वनी, हवा, जल प्रदूषणाबरोबर वन्यजीवांच्या अधिवास संकटात टाकले आहेत. गेल्या दोन वर्षांत तर वन्यजीव शिकार प्रतिबंध कृती दल निकामी झाल्याने, त्याचा गैरफायदा घेत वन्यजीवांची शिकार बिनदिक्कतपणे होऊ लागली आहे. नैसर्गिक जंगलाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असल्याने, आज दशकभरात साटरे, करंझोळ, झर्मे, करमळी बुद्रुक आणि इतर ठिकाणी ज्या भूस्खलनाच्या दुर्घटना घडलेल्या आहेत, त्या सत्तरीच्या अस्तित्वाला धोकादायक ठरलेल्या आहेत. साटरेतील 'आम्याचा गवळ' येथे जे भूस्खलन घडले, त्यानंतर सरकार नियुक्त समितीने ज्या दूरगामी सूचना केल्या, त्याची काडीमात्र दखल घेण्यात आलेली नसल्याने, आगामी काळातही भूस्खलनाच्या दुर्घटना उद्भवून, सत्तरीच्या शाश्वत विकासाच्या संकल्पनेला सुरुंग लागणार आहे. आजही जंगलतोड करून बागायती क्षेत्र विस्तारत असल्याने, भूस्खलनाची प्रकरणे वाढणार आहेत.
अशा पार्श्वभूमीवर भौगोलिक दृष्टीने आकाराने छोट्या असलेल्या गोव्याचे अस्तित्व शाश्वतरित्या टिकवण्यासाठी राज्यातील बहुतांश पश्चिम घाटाच्या पर्वत शिखरांची आणि जंगलांची श्रीमंती मिरवणारा प्रदेश सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. गोव्यातील जुन्या काबिजादीत येणारे तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी हे तालुके सागरी पर्यटनाच्या अराजक विस्तारापायी आपले हिरवाईने नटलेले नैसर्गिक आच्छादन कधीच हरवून बसलेले आहे आणि सागरी पर्यटनाचा हाच कित्ता काणकोण, पेडणे आदी नव्या काबिजादीतील पश्चिम किनारपट्टीवरील गावी गिरवल्याने केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र विसर्जनाच्या समस्येच्या ताणाखाली संकटग्रस्त आहेत. त्यामुळे केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सातव्या मसुद्यात सह्याद्रीतील बहुतांश गावांचा समावेश करण्यात आल्याने, राज्याच्या पेयजल, प्राणवायू यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन केले जाणार आहे. गोव्यात आज पर्यटन व्यवसायाचे जास्तीत जास्त चोचले पुरवण्यासाठी सागरी किनाऱ्यावरच्या 'ऑलिव्ह रिडली' कासवांच्या त्याचप्रमाणे 'मारवेली'च्या तसेच खारफुटींच्या नैसर्गिक अधिवासावर घाला घालण्याचे धाडस केले जात आहे, हे खेदजनक आहे. त्यासाठी पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्रांच्या निर्मितीने राज्याचे वर्तमान आणि भवितव्य अधिक सुरक्षित होणार आहे.
- राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५


