राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा दबदबा

Story: क्रीडारंग - मुष्टियुद्ध |
03rd August, 11:24 pm
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा दबदबा

ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य पदकांसह एकूण ३९ पदकांची कमाई केली आहे. या शानदार कामगिरीसह भारताने पदक तालिकेत आपले चौथे स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर राहिले.

बर्मिंगम येथील २०२२ मधील ६१ पदकांच्या तुलनेत ही संख्या कमी वाटत असली, तरी ग्लासगो येथे अवघ्या १० खेळांचा समावेश होता आणि भारताने १२३ खेळाडूंचे मर्यादित पथक पाठवले होते. यापैकी ३८ खेळाडूंनी पदके जिंकल्याने भारताचा यश दर ३१ टक्के राहिला, जो गेल्या स्पर्धेपेक्षा (२९ टक्के) अधिक आहे.

भारताच्या एकूण पदकांमध्ये मुष्टियोद्ध्यांचा वाटा सर्वाधिक राहिला. १४ सदस्यीय संघातील १० खेळाडूंनी पदकांवर नाव कोरले. बॉक्सिंगमधून ७ सुवर्ण आणि ३ रौप्य अशी एकूण १० पदके मिळाली. जस्मिन लांबोरिया, साक्षी चौधरी, प्रीती पवार, प्रिया घंघास, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच आणि अंकुश पंघाल यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर लव्हलिना बोरगोहेन, जादू मणी सिंग आणि नरेंद्र बेरवाल यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात भारताला ज्युडोमध्ये प्रथमच सुवर्णपदक मिळाले. अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्ण, यामिनी मौर्यने रौप्य तर उन्नती शर्माने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला.

पॅरा अॅथलेटिक्समध्ये ११ सदस्यांच्या पॅरा पथकाने ३ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्यसह ६ पदके जिंकली. दिलीप गावित, सोमन राणा आणि शर्मिला धनकड यांनी सुवर्ण कामगिरी केली.

अॅथलेटिक्समध्ये भारताला सर्वाधिक १० पदके मिळाली असली, तरी एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही. भालाफेकमध्ये स्टार खेळाडू नीरज चोप्राला रौप्य, तर यशवीर सिंगला कांस्यपदक मिळाले. गुलवीर सिंगने १० हजार मीटर शर्यतीत रौप्य आणि ५ हजार मीटरमध्ये कांस्य जिंकून इतिहास घडवला. तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये भारताला पहिले राष्ट्रकुल पदक मिळवून दिले. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ८ पदके मिळाली. त्यात मीराबाई चानूने सलग तिसरे राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम केला.

लॉन बॉल्स, जिम्नॅस्टिक्स, स्विमिंग आणि सायकलिंगमध्ये भारताला एकही पदक मिळवता आले नाही. १६ वर्षीय ट्रॅक सायकलपटू लीशा दासची संघर्षगाथा चर्चेत राहिली, मात्र तिला पदकाने गुंगारा दिला. एकंदरीत, प्रमुख खेळांचा समावेश नसतानाही भारतीय खेळाडूंनी दाखवलेले सातत्य आगामी ऑलिंपिकच्या दृष्टीने अत्यंत आशादायक मानले जात आहे.

- प्रवीण साठे