सन्मानाचा सन्मानही व्हायला हवा !

Story: विशेष |
04th August, 11:57 pm
सन्मानाचा सन्मानही व्हायला हवा !

गोव्यात भाषा, साहित्य, कला आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी गेली अनेक दशके सातत्याने कार्य करणाऱ्या इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) या संस्थेचे योगदान निश्चितच मोलाचे आहे. संस्थेची स्थापना ज्या उदात्त हेतूने झाली, त्यात भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा प्रचार-प्रसार, विविध व्याख्याने, परिसंवाद, प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन यांचा स्पष्ट उल्लेख आहे. पणजीतील हे केंद्र आज गोव्याच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानले जाते.

सध्या संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब आणि सदस्य सचिव म्हणून कला व संस्कृती संचालनालयाचे सेवानिवृत्त सहसंचालक अशोक परब कार्यरत आहेत. दोघांचाही सांस्कृतिक क्षेत्राशी जवळचा संबंध असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या कामाचा दर्जा उंचावेल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. आजही वर्षभर येथे विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे संस्थेच्या कार्याबद्दल कोणालाही तक्रार करण्यास फारशी जागा नाही.

मात्र, एखाद्या संस्थेची खरी ओळख तिच्या कार्यक्रमांइतकीच त्या कार्यक्रमामागील संवेदनशीलतेतूनही ठरत असते.

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा होणारा पत्रकार दिन हा पत्रकारांसाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा दिवस असतो. या दिवशी ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करणे ही 'आयएमबी'ची परंपरा स्तुत्य आहे. यंदाही रमेश कोलवाळकर, गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट्सचे अध्यक्ष राजतिलक नाईक, राजेश परब यांसारख्या ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात आला. हा क्षण आनंदाचा होता; पण त्या सन्मानाचे स्वरूप पाहून मनात एक सलही निर्माण झाली.

आजच्या काळात तीन-चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेची सेवा केलेल्या व्यक्तींना केवळ अडीच हजार रुपयांची रोख रक्कम आणि साधे, कोणतीही संस्थात्मक ओळख नसलेले स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करणे, हे त्या सन्मानाच्या प्रतिष्ठेला साजेसे वाटत नाही. हा प्रश्न रकमेचा नाही; तर सन्मानाच्या दर्जाचा आहे.

गोव्यातील सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या आयएमबीसारख्या संस्थेला ज्येष्ठ पत्रकारांसाठी किमान दहा हजार रुपयांचा सन्मान निधी देणे अजिबात अशक्य नाही. संस्थेच्या वार्षिक अर्थसंकल्पाचा विचार केला, तर हा खर्च अत्यल्प आहे. पण त्यातून सन्मानित होणाऱ्या व्यक्तींच्या मनात संस्थेबद्दलचा आदर अनेकपटींनी वाढेल.

स्मृतिचिन्हाच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल. संस्थेच्या नावाचा, बोधचिन्हाचा किंवा स्थापत्याची ओळख दर्शविणारा दर्जेदार स्मृतिचिन्ह तयार करणे कठीण नाही. त्याऐवजी हस्तकला दालनातून घाईघाईने आणलेली एखादी वस्तू देणे, हे 'आयएमबी'सारख्या प्रतिष्ठित संस्थेला शोभणारे नाही. अशा प्रकारची स्मृतिचिन्हे लहान संस्था देतात, ते समजण्यासारखे आहे; पण राज्यातील अग्रगण्य सांस्कृतिक संस्थेने स्वतःची वेगळी ओळख जपणे अपेक्षित असते.

ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसावा. तो त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानाचा, समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव असतो. त्यामुळे त्या सन्मानातही मोठेपणा आणि आत्मीयता दिसली पाहिजे.

'आयएमबी'विषयी लेखक, पत्रकार, कलाकार, साहित्यिक आणि वाचक यांच्या मनात अपार आदर आहे. हा आदर टिकवायचा असेल, तर संस्थेने आपल्या प्रत्येक उपक्रमात गुणवत्तेबरोबरच संवेदनशीलतेलाही प्राधान्य दिले पाहिजे. कार्यक्रम भव्य असावेतच; पण त्यामागील मूल्येही तितकीच भव्य असली पाहिजेत. टिळक पुण्यतिथीला ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्याची परंपरा निश्चितच जपली पाहिजे. मात्र, त्या सन्मानाचे स्वरूपही काळानुरूप बदलले पाहिजे. सन्मानित व्यक्तीला मिळणाऱ्या रकमेपेक्षा त्याला मिळणारा आदर अधिक मोठा असतो. पण तो आदर सन्मानाच्या प्रत्येक घटकातून दिसलाही पाहिजे. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा ही गोव्याच्या सांस्कृतिक विश्वातील एक प्रतिष्ठित संस्था आहे. त्या प्रतिष्ठेला साजेसा प्रत्येक सन्मान असावा, हीच अपेक्षा. कारण सन्मान हा केवळ देण्याची गोष्ट नसते; तो संस्थेच्या संस्कृतीचे आणि संवेदनशीलतेचे प्रतिबिंब असते.

- वामन प्रभू