पणजी ते जुवारी पूल हा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील टप्पा गोव्यातील सर्वात महत्त्वाचा आणि व्यस्त मार्ग मानला जातो. उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत या महामार्गावर रस्ते अपघातांचे प्रमाण वेगाने वाढले असून हा रस्ता वाहनचालकांसाठी धोक्याचा बनला आहे. या टप्प्यातील मागील दोन वर्षांतील अपघातांची आकडेवारी पाहिली असता, पणजी ते जुवारी पुलादरम्यान १६० हून अधिक गंभीर तसेच किरकोळ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातात सुमारे २८ जणांना जीव गमवावा लागला आहे, तर ५५ हून अधिक गंभीर जखमी झाले असून काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. या परिसरातील एकूण अपघाती मृत्यूमंध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे.
या परिसरात मागील १५ दिवसांत भीषण आणि विचित्र अपघात झाले आहेत. अशा प्रकारचे अपघात यापूर्वी गोव्यात कधी झाले नव्हते. १ ऑगस्ट रोजी पहाटे बांबोळी परिसरातील 'फुलांचो खुरिस'जवळ एक भीषण अपघात झाला. पणजीहून मडगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने महामार्गावरील क्रॅश बॅरियरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडी थेट सर्व्हिस रोडवर फेकली गेली आणि इंजिनने तत्काळ पेट घेतला. कारमध्ये अडकलेल्या तीन तरुणांपैकी एकाचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. त्यापूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळासमोरील फ्लायओव्हरवर १९ जुलै रोजी चार वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसून एक भीषण व विचित्र अपघात घडला होता. अपघातातील चारही वाहने आगशीहून पणजीच्या दिशेने जात होती. फ्लायओव्हरवर पोहोचल्यानंतर एका कारचालकाने अचानक आपली लेन बदलली. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कारचालकाला पुढच्या वाहनाचा अंदाज न आल्याने त्याने समोरील कारला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार डाव्या बाजूच्या सुरक्षा कठड्याला धडकून बाजूने जाणाऱ्या एका कारच्या छतावर जाऊन उलटली. वरील दोन्ही अपघात विचित्र होते. या परिसरात अशा प्रकारचे अनेक अपघात झाले आहेत.
या परिसरासह इतर ठिकाणी अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलिसांनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काही ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी महामार्गावर स्पीड कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्याची गरज आहे. ‘अपघात प्रवण’ क्षेत्रांची पाहणी करून ते रस्ते सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच रात्रीच्या वेळी नाकाबंदी करून मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर विशेष कारवाई करावी. याशिवाय रस्त्यांच्या रचनेची पुनर्तपासणी करून आवश्यक सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे.
- प्रसाद शेट काणकोणकर


