अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत समोर आलेली एक घटना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरील धोक्याची गंभीरता अधोरेखित करते. तुर्कीतील नाटो शिखर परिषदेनंतर ट्रम्प यांनी नेहमीच्या पद्धतीने प्रवास केल्याचे जगाला वाटत असताना, प्रत्यक्षात त्यांना गुप्तपणे दुसऱ्या लष्करी विमानातून ब्रिटनला रवाना करण्यात आले. या संपूर्ण कारवाईमागे इराणकडून मिळालेली विश्वासार्ह हत्या-धमकी असल्याचे वृत्त आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना महत्त्वाची आहे, कारण राष्ट्राध्यक्षांच्या हालचाली लपवण्यासाठी अमेरिकेला स्वतःच्या माध्यमांनाही अनभिज्ञ ठेवावे लागले. ट्रम्प पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर जुन्या 'एअर फोर्स वन'मध्ये चढले. मात्र त्यानंतर त्यांना विमानतळावरील कॅटरिंग ट्रकच्या माध्यमातून गुपचूप बाहेर काढून 'सी-३२-ए' या छोट्या लष्करी विमानात बसवण्यात आले. दुसरीकडे पत्रकार आणि व्हाईट हाऊसचे काही कर्मचारी जुन्या 'एअर फोर्स वन'मध्येच राहिले. हे विमान जणू ट्रम्प त्यातच आहेत, असा आभास निर्माण करण्यासाठी ‘डिकॉय’ म्हणून वापरण्यात आले.
या घटनेतून एक अस्वस्थ करणारा प्रश्न समोर येतो. धोका नेमका किती गंभीर होता? राष्ट्राध्यक्षांचा विमानप्रवास हा आधीपासूनच अत्यंत सुरक्षित असतो. तरीही गुप्तचर यंत्रणांना विमानाची ओळख आणि राष्ट्राध्यक्षांची प्रत्यक्ष स्थिती लपवण्याची गरज भासली, याचा अर्थ संभाव्य हल्ल्याचा धोका साधा नव्हता. व्हाईट हाऊसनेही अशा सुरक्षा उपाययोजना राष्ट्राध्यक्षांच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
या घटनेचा दुसरा पैलू इराण-अमेरिका संघर्षाशी जोडलेला आहे. पश्चिम आशियात अमेरिकेची लष्करी उपस्थिती आणि इराणसोबत वाढलेला तणाव यामुळे ट्रम्प हे केवळ राजकीय लक्ष्य राहिलेले नाहीत, तर संभाव्य लष्करी लक्ष्यही बनले आहेत. त्यामुळे भविष्यात ट्रम्प यांचा परदेशातील प्रत्येक दौरा केवळ राजनैतिक कार्यक्रम न राहता एक मोठे सुरक्षा अभियान ठरू शकतो.
विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी स्वतः विमानप्रवासादरम्यान पत्रकारांना सुरक्षेच्या धोक्याबाबत सूचक वक्तव्य केले होते. मात्र प्रत्यक्षात ते ज्या विमानात असल्याचे सर्वांना वाटत होते, त्यात ते नव्हते. म्हणजेच संपूर्ण ऑपरेशनचा केंद्रबिंदू होता, गोंधळ निर्माण करणे आणि राष्ट्राध्यक्षांचे खरे ठिकाण लपवणे.
अशा प्रकारची युक्ती अमेरिकेसाठी नवी नाही. २००० मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यानही बनावट एअर फोर्स वनचा वापर दिशाभूल करण्यासाठी करण्यात आला होता. मात्र आजच्या काळात उपग्रह, विमानांच्या हालचालींचे ऑनलाइन निरीक्षण आणि सोशल मीडिया यामुळे अशा ऑपरेशनची गुप्तता राखणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे.
- सचिन दळवी


