पणजी : दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा येथील रगाडा नदीत बुडून बेपत्ता झालेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात शोध आणि बचाव पथकाला अखेर यश आले आहे. साकोर्डा येथील पानसवाडा भागातील रहिवासी असलेले खुशाली सदा मापारी असे या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी रात्री मित्रांसोबत फिरण्यासाठी गेले असताना रगाडा नदीपात्रात पैज लावून पोहण्याचा प्रयत्न करताना ते वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात वाहून गेले होते.
घटनेची माहिती मिळताच कुळे पोलीस आणि फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबवली होती. गुरुवारी सकाळी रगाडा नदीच्या पात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक पंचनामा केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास कुळे पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे साकोर्डा आणि पानसवाडा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साकोर्डा येथील पानसवाडा भागात राहणारे खुशाली सदा मापारी हे आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर पडले होते. रात्रीच्या सुमारास सर्व मित्र रगाडा नदीकाठी एकत्र आले असता, गप्पा मारताना खुशाली यांनी पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणारी रगाडा नदी रात्रीच्या अंधारात पोहून पार करण्याचे आव्हान स्वीकारत पैज लावली. मित्रांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असला, तरी खुशाली यांनी पाण्याच्या वेगाचा व खोलीचा अंदाज न घेता थेट नदीपात्रात उडी मारली. त्यांनी काही अंतर पोहून पार केले; परंतु मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढलेली होती आणि पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता. त्यामुळे पाण्याच्या तीव्र प्रवाहात ते वाहून जाऊ लागले.
नदीच्या काठावर असलेल्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने आणि अंधार पसरल्याने कोणालाही पात्रात उतरणे शक्य झाले नाही. मित्रांनी तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक नागरिक, कुळे पोलीस आणि अग्निशामक दलाला दिली. माहिती मिळताच फोंडा अग्निशमन दल आणि कुळे पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्रीची वेळ आणि घनदाट अंधार यामुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. अखेर गुरुवारी सकाळी पुन्हा नव्याने शोधमोहीम हाती घेण्यात आली आणि नदीपात्रात काही अंतरावर खुशाली यांचा मृतदेह आढळून आला.


