गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे १७ ऑगस्ट रोजी गोव्याला भेट देणार आहेत. बूथ स्तरासह विविध समित्यांच्या बैठका घेण्याबरोबरच ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची गोवा भेट महत्त्वाची ठरणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे आणि विधिमंडळ पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा करण्याबरोबरच त्यांनी खर्गे यांना १७ ऑगस्ट रोजी गोवा भेटीचे निमंत्रण दिले. राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे १७ ऑगस्ट रोजी गोव्याला भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती विधिमंडळ पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली.
राज्यातील ४० मतदारसंघांमध्ये पक्षाचा संघटनात्मक वावर वाढविण्यासह विविध समित्यांमध्ये समन्वय साधण्याबाबत दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली. राज्य कार्यकारिणीसह जिल्हा समिती, महिला काँग्रेस आणि सेवा दलाच्या समित्यांच्या बैठका खर्गे घेणार आहेत. गेल्या महिन्यात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल गोव्यात येऊन गेले. त्यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोव्याला भेट देत आहेत.
समविचारी पक्षांचे नेते घेणार खर्गेंची भेट
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपविरोधी पक्षांच्या युतीबाबत काँग्रेसने समिती स्थापन केल्यानंतर विरोधी आघाडीच्या चर्चेलाही सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची इतर विरोधी पक्षांचे अध्यक्ष किंवा नेत्यांशी भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची गोवा भेट महत्त्वाची ठरणार आहे.

वेणुगोपाल यांचीही घेतली भेट
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रभारी माणिकराव ठाकरे आणि विधीमंडळ नेते युरी आलेमाव यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. संघटनात्मक बांधणीसह मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा भेटीच्या व्यवस्थेविषयी त्यांच्यात चर्चा झाली.


