तोणीर-काजरेधाट धबधब्यावर पोलीस, वन खात्याचा कडक बंदोबस्त

विद्यार्थी बुडाल्यानंतर प्रशासन सतर्क : जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला सविस्तर अहवाल

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
12th August, 11:57 pm
तोणीर-काजरेधाट धबधब्यावर पोलीस, वन खात्याचा कडक बंदोबस्त

वाळपई : सत्तरी तालुक्यातील सावर्डे पंचायत क्षेत्रातील तोणीर-काजरेधाट धबधब्यावर ७ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रशासन यंत्रणा सतर्क झाली असून, धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाळपई पोलीस आणि वन खात्याचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धबधब्याच्या परिसरात कोणालाही प्रवेश करता येऊ नये, यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोलीस आणि वन कर्मचारी तैनात ठेवण्यात येत असून, पर्यटकांना धबधब्याकडे जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
या दुर्घटनेत वास्को येथील दीपविहार हायर सेकंडरी विद्यालयाचा विद्यार्थी राहुल बिंद याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण गोव्यात खळबळ उडाली होती. उपलब्ध माहितीनुसार, विद्यालयातील शिक्षकांनी संबंधित खात्यांची आवश्यक परवानगी न घेता सुमारे २० विद्यार्थ्यांना ट्रेकिंगसाठी धबधब्याच्या परिसरात आणले होते. त्याच दरम्यान राहुल बिंद हा विद्यार्थी धबधब्याच्या पाण्यात पडून बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सत्तरीचे उपजिल्हाधिकारी तसेच उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत वन खात्याकडून तातडीने सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
प्रशासनाने मुख्य प्रवेशमार्गावर बंदोबस्त ठेवला असला तरी आडमार्गाने धबधब्याकडे जाणे अद्यापही शक्य असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, दुर्घटनेनंतरही दीपविहार हायर सेकंडरीतील काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दुसऱ्या मार्गाने धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.
उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी वन खात्याला २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वन खात्याने अहवाल सादर केल्याची माहिती मिळाली असली तरी त्यातील तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
सोशल मीडियावरील प्रचारावर निर्बंधांची तयारी
या धबधब्याचे आकर्षक व्हिडिओ, छायाचित्रे आणि ट्रेकिंगचे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने अनेक तरुण या ठिकाणी आकर्षित होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर या धबधब्याचा प्रचार रोखण्यासाठी वन खाते सायबर सेलची मदत घेण्याच्या तयारीत आहे. धबधब्याचे लोकेशन, ट्रेकिंग मार्ग, आकर्षक व्हिडिओ किंवा पर्यटकांना प्रोत्साहन देणारी सामग्री प्रसारित होऊ नये, यासाठी विशेष पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.                  

हेही वाचा
सर्व पहा