म्हापसा : पोलीस खात्याने ४० पेक्षा जास्त वयोगटातील गृहरक्षकांना पोलीस कंट्रोल रूम (पीसीआर) कक्षात हजेरी लावण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानंतर अनेक गृहरक्षकांनी आपले विद्यमान सेवास्थळ सोडले असून याचा परिणाम पर्वरी व म्हापसासह राज्यातील अनेक पोलीस स्थानकांच्या कॅन्टीनच्या कामाकाजावर झाला आहे. कर्मचाऱ्यांअभावी या कॅन्टीन बंद कराव्या लागल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
राज्य पोलीस खात्याकडून ६०० नव्या चारचाकी गाड्या खरेदी केल्या आहेत. पीसीआर (रॉबर्ट) आणि विविध पोलीस स्थानकामध्ये चारचाकींच्या वाहनांची कमतरता आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी या नवीन गाड्या घेण्यात आल्या. या गाड्यांवर विशेषत: पीसीआर वाहनांवर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत एक गृहरक्षक तैनात करण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे. त्यानुसार गृहरक्षक विभागाचे अधीक्षक रॉय परेरा यांनी बिनतारी संदेश पाठवून नऊही गृहरक्षक सेलमधील ४० पेक्षा जास्त वयोगटातील कर्मचाऱ्यांना पीसीआरमध्ये हजेरी लावण्याचे निर्देश दिले होते.
हा बिनतारी संदेश जून महिन्यात जारी करण्यात आला होता. त्यानुसार, ४० च्यावर वय असलेल्या गृहरक्षकांनी अधीक्षकांच्या आदेशाचे पालन केले आणि ते विद्यमान जागेवरून पीसीआरमध्ये रूजू झाले आहेत.
या गृहरक्षकांपैकी अनेकजण हे राज्यातील विविध पोलीस स्थानकांमधील कॅन्टीनमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होते. परंतु वरील आदेशानुसार त्यांनी हे कॅन्टीनमधील काम साडले आणि कर्मचाऱ्यांअभावी कॅन्टीन बंद पडली आहेत. गेल्या आठवड्यापासून कॅन्टीन बंदची ही समस्या निर्माण झाल्याने पोलीस अधिकारी देखील चिंतेत आहेत.
बार्देश तालु्क्यातील म्हापसा व पर्वरी ही पोलीस स्थानके मोठी आहेत. पर्वरी पोलीस स्थानक संकुलात उत्तर गोवा पोलीस मुख्यालय, दोन उपअधीक्षक कार्यालये, वाहतूक पोलीस सेल तर म्हापसा पोलीस स्थानक इमारतीमध्ये पोलीस स्थानकाबरोबरच उपअधीक्षक कार्यालय, वाहतूक पोलीस विभाग, विशेष शाखा अशा विभागांचा समावेश आहे. या दोन्ही पोलीस स्थानकांतील कॅन्टीनवर जवळपास ५०० कर्मचारी अवलंबून आहेत.
दरम्यान, ही कॅन्टीन पूर्ववत सुरू करण्याच्या हेतूने पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न चालवले आहेत. कॅन्टीनचा स्वयंपाक बनवण्यासाठी कामगारांची चाचपणी सुरू असून हे कामगार मिळाल्यानंतर लगेच कॅन्टीन सुरू केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
गुन्हेगारांसाठी आणावे लागते बाहेरून जेवण
अचानक कॅन्टीन बंद झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नाश्ता व जेवणाची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय अटक करून पोलीस कोठीडीत ठेवलेल्या गुन्हेगारांच्या जेवणखाणाची व्यवस्था याच कॅन्टीनमार्फत व्हायची. मात्र, कॅन्टीनच बंद असल्याने अधिकारी वर्गाला विशेषत: तपास अधिकाऱ्यांना या गुन्हेगारांना जेवण हे बाहेरून पदरमोड करून आणावे लागत आहे. त्यामुळे कॅन्टीन बंदचा आर्थिक फटका तपास अधिकाऱ्यांना सोसावा लागत आहे.


