नदी पोहून पार करण्याची पैज बेतली जीवावर

साकोर्डा येथील एक जण रगाडा नदीत बुडाला. मित्रांसोबत लावलेली पैज आली अंगलट. हकनाक गमावला जीव. अंधारामुळे ठावठिकाणा न लागल्याने शोधकार्य थांबविले.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th August, 10:45 pm
नदी पोहून पार करण्याची पैज बेतली जीवावर

फोंडा : मित्रांसोबत ​फिरण्यासाठी गेलेल्या साकोर्डा (Sacorda) येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीने ​रात्रीच्या वेळी रगाडा नदी (Ragada river) पाेहून पार करण्याची पैज (bet) लावली. मात्र पावसामुळे नदीपात्राचा अंदाज​ त्याला आला नाही आणि तो प्रवाहासोबत वाहून गेला. त्याचा शोध घेऊनही ठावठिकाणा न लागल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

बुधवारी रात्री मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेला खुशाली सदा मापारी (५५, पानसवाडा-साकोर्डा) हा व्यक्ती रगाडा नदीपात्रात बुडाला. त्याचा शोध घेण्यासाठी फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण अंधार असल्याने खुशाली याचा शोध घेता आला नाही. बुधवारी सायंकाळी आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला असता, खुशाली मापारी याने आपण रात्रीच्या वेळी रगाडा नदी पोहून पार करू शकतो, असे सांगून पैज लावली. त्याने नदीच्या प्रवाहात उडी मारली आणि काही अंतर पाेहून गेला. मात्र पाण्याची पातळी वाढल्याने खुशाली पाण्यात बुडाला. पाण्याची पातळी अधिक असल्याने नदीच्या काठावर आसलेल्या मित्रांना त्याला वाचवता आले नाही.

या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर कुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन खुशालीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण अंधार असल्याने त्याचा ठावठिकाणा लागला नाही. गुरुवारी सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा