पणजी : मडगाव शहरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची नोंद झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. मडगाव नागरी आरोग्य केंद्राने (UHC) दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, शहरात सध्या डेंग्यूचे आठ संशयित (NS1) रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याची पथके आणि मडगाव नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात व्यापक पातळीवर धूर फवारणी (फॉगिंग) आणि डास प्रतिबंधक मोहीम सातत्याने राबवली जात आहे. सध्या शहरातील डेंग्यूची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. तथापि, पावसाळी हवामान आणि ठिकठिकाणी साचणाऱ्या पावसामुळे डासांची पैदास वाढण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याची शक्यता मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. बॅप्टिस्टो मास्कारेन्हास यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात मडगाव पोलीस ठाणे परिसरात डेंग्यूचे सुमारे पाच रुग्ण आढळून आल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात घबराट पसरली होती. मात्र, आरोग्य खात्याने तात्काळ पावले उचलत त्या भागात विशेष स्वच्छता आणि धूर फवारणी मोहीम राबवली. या तातडीच्या उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांत मडगाव पोलीस ठाणे परिसरात नवीन कोणत्याही रुग्णाची नोंद झालेली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे. शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये सध्या तुरळक स्वरूपात रुग्ण आढळून येत असले, तरी अचानक रुग्णसंख्येत कोणतीही चिंताजनक वाढ झालेली नाही. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक ओव्हरटाईम काम करत असून, मोठ्या फॉगिंग मशिनच्या साह्याने दररोज विविध निवासी भाग आणि मुख्य रस्त्यांवर औषध फवारणी केली जात आहे.
डेंग्यूचा प्रसार प्रामुख्याने साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालणाऱ्या डासांमुळे होतो. पावसाळ्यात घरांच्या परिसरात, छतावर, उघड्यावर टाकलेल्या टाकाऊ वस्तू, फुटक्या नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकचे डबे तसेच लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये पाणी साचून राहते. हीच साचलेल्या पाण्याची ठिकाणे डासांसाठी मुख्य उत्पत्ती स्थाने ठरतात. आरोग्य खात्याचे कर्मचारी मर्यादित असल्याने ते घरोघरी जाऊन डासोत्पत्ती स्थानांची पाहणी करत आहेत. परंतु, केवळ आरोग्य यंत्रणेच्या बळावर या संसर्गजन्य आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे अशक्य असून प्रत्येक नागरिकाने स्वतःहून आपल्या घराभोवती स्वच्छता राखणे आणि साचलेले पाणी उपसणे अत्यंत गरजेचे आहे.
सध्या मडगाव नगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या सर्व टीम्स एकत्र येऊन समन्वयाने काम करत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नांना सर्वसामान्य नागरिकांची सक्रिय साथ मिळणे आवश्यक आहे. जर प्रत्येक मडगावकराने आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून साचलेले पाणी त्वरित उपसले आणि डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट केली, तर मडगाव शहरातून डेंग्यूवर पूर्णपणे मात करणे सहज शक्य होईल, असा विश्वास आरोग्य प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.


