भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेस पक्ष खरोखरच गंभीर आहे का : अमित पाटकर

माध्यमांतून दिल्ली दौऱ्याची माहिती मिळाल्याने काँग्रेस अध्यक्षांच्या भूमिकेवर पाटकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
5 mins ago
भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेस पक्ष खरोखरच गंभीर आहे का : अमित पाटकर

पणजी : गोव्यातील आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, काँग्रेसचे वरिष्ठ नेते गिरीश चोडणकर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. या उच्चस्तरीय भेटीदरम्यान गोव्यातील पक्षाची संघटनात्मक स्थिती, आगामी निवडणूक रणनीती आणि विरोधी पक्षांशी होणाऱ्या संभाव्य युतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या दिल्ली दौऱ्यानंतर गोव्यातील पक्षांतर्गत हालचाली आणि राजकीय वर्तुळातील चर्चेला उधाण आले असून, नेत्यांच्या वक्तव्यांमुळे नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटले आहे.

गेली चार वर्षे मी वेळ, ऊर्जा आणि सर्वस्व पणाला लावले.. अमित पाटकर 

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी काँग्रेसच्या अंतर्गत समन्वयाबाबत आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियोजित गोवा दौऱ्याबाबत प्रश्न विचारला असता, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पाटकर म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे गोव्यात संघटनात्मक बाबींची चर्चा करण्यासाठी येत आहेत, ही माहिती आपल्याला पक्षाकडून थेट मिळण्याऐवजी माध्यमांतून कळाली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. गेल्या चार वर्षांपासून आपण पक्षाची संघटना तळागाळात मजबूत करण्यासाठी आपला वेळ, ऊर्जा आणि सर्वस्व पणाला लावले आहे. असे असतानाही, ज्या नेत्यांनी पक्षासाठी रात्रंदिवस परिश्रम केले आणि ज्यांना पक्षाच्या संघटनेची खरी समज आहे, त्यांनाच जर अशा महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आणि दौऱ्यांमध्ये विश्वासात घेतले जात नसेल, तर पक्षात नक्की कोणत्या प्रकारचा व्यवहार सुरू आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वरिष्ठ नेत्यांना डावलून परस्पर निर्णय घेण्याच्या या पद्धतीमुळे आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेस पक्ष खरोखरच गंभीर आहे का, असा थेट आणि गंभीर संशय आपल्या मनात निर्माण होत असल्याचे अमित पाटकर यांनी उघडपणे स्पष्ट केले.

गिरीश चोडणकरांनी युतीचे पत्र व्हॉट्सॲपवर पाठवले तरी मला चालेल : विजय 

दुसरीकडे, काँग्रेसने विरोधी पक्षांना पाठवलेल्या युतीच्या पत्रावर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्यावर गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी आपली भूमिका मांडली. गिरीश चोडणकर यांनी पाठवलेल्या पत्राबाबत बोलताना सरदेसाई यांनी सांगितले की, चोडणकर यांच्याशी आपले कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर अतिशय स्नेहाचे आणि कौतुकास्पद संबंध आहेत. त्यामुळे युती संदर्भातील औपचारिक पत्राची हार्ड कॉपी पाठवण्याऐवजी गिरीश चोडणकर यांनी ते पत्र थेट व्हॉट्सॲपवर मेसेज केले तरी ते आपल्याला स्वीकार्य ठरेल आणि त्यात कोणतीही अडचण नाही. काँग्रेस अध्यक्षांच्या गोवा आगमनाचे स्वागत करतानाच सरदेसाई यांनी स्पष्ट केले की, भूतकाळात राजकीय पटलावर काय घडले ते विसरून पुढे जाण्याची आपली आणि आपल्या पक्षाची पूर्ण तयारी आहे.

पुढे बोलताना विजय सरदेसाई म्हणाले की, गोव्यात सध्या सत्ताधारी भाजपविरोधात सामान्य जनता आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असून, आगामी काळात भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र राहणे काळाची गरज आहे. २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी काँग्रेस पक्षासोबत असलेली युती आणि समन्वय कायम ठेवण्याबाबत आपला पक्ष पूर्णपणे सकारात्मक आहे. राजकीय पक्षांनी एकमेकांचा आदर राखून आणि पक्षांतर्गत नियम पाळून समन्वयाने काम केले तरच गोव्याच्या जनतेचे हित साधता येईल, असे प्रतिपादनही त्यांनी शेवटी केले.

हेही वाचा
सर्व पहा