पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सत्ताधारी भाजपविरोधात सर्व प्रमुख विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने आपले प्रयत्न अधिक गतिमान केले आहेत. राज्यातील बहुतांश विरोधी पक्ष भाजपविरोधी महायुतीसाठी सकारात्मक भूमिका घेत असून, 'आम आदमी पक्षा'च्या अधिकृत आणि अंतिम उत्तराची अद्याप प्रतीक्षा असल्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे. या राजकीय घडामोडींसोबतच काँग्रेसने राज्यातील सर्व ४० मतदारसंघांमध्ये पक्ष संघटना तळागाळात मजबूत करण्यासाठी ब्लॉक स्तरावर व्यापक रणनीती आखली आहे.
पक्षाच्या आगामी रणनीतीचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व ४० मतदारसंघांतील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली. या बैठकीत बूथ लेव्हल एजंट्स नियुक्ती, त्यांची पडताळणी आणि आगामी प्रशिक्षण कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व मतदारसंघांत पक्ष संघटना पुन्हा आक्रमकपणे आणि सक्षमपणे उभी करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. याच संघटन मजबुतीचा भाग म्हणून येत्या २२ तारखेपासून विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्या नेतृत्वाखाली 'गोवा राखण यात्रा' आयोजित केली जाणार आहे. या यात्रेचा मार्ग, रूपरेषा आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव याविषयीची रणनीती या बैठकीत निश्चित करण्यात आली. याशिवाय, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आगामी गोवा दौऱ्याच्या नियोजित कार्यक्रमावरही बैठकीत सविस्तर मंथन झाले, अशी माहिती चोडणकर यांनी दिली. १७ ऑगस्ट रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गोव्या दौऱ्यावर येतील असेही चोडणकर यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत अनेक पात्र मतदारांची नावे यादीतून मुद्दाम किंवा तांत्रिक चुकांमुळे वगळण्यात आल्याची बाब काँग्रेसच्या निदर्शनास आली आहे. कोणत्याही नागरिकाचा लोकशाहीतील मतदानाचा मूलभूत हक्क हिरावला जाऊ नये, यासाठी सर्व ब्लॉक नेत्यांना तातडीने लक्ष घालून यादी दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राजकीय आघाड्यांबाबत बोलताना, भाजपला पराभूत करण्यासाठी जनतेच्या इच्छेचा आदर करत काँग्रेस एका मोठ्या भावाची भूमिका बजावत सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. याच उपक्रमांतर्गत रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या अध्यक्षांना युतीची चर्चा सुरू करण्यासाठी अधिकृत पत्र पाठवण्यात आले असून, यावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे. दुसरीकडे, 'आप'च्या स्थानिक अध्यक्षांशी प्राथमिक चर्चा झाली असली, तरी त्यांच्या केंद्रीय आणि स्थानिक पातळीवरील भूमिकेतील अस्पष्टतेमुळे युतीबाबत त्यांच्याकडून अधिकृत उत्तर येणे अद्याप बाकी आहे असेही त्यांनी सांगितले.


