सांगे, कुंकळ्ळीत सायबर फसवणुकीच्या दोन घटनांत २.५३ लाखांचा गंडा

सायबर फसवणुकीच्या प्रकारांत दिवसेंदिवस वाढ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14 mins ago
सांगे, कुंकळ्ळीत सायबर फसवणुकीच्या दोन घटनांत २.५३ लाखांचा गंडा

सांगे/कुंकळ्ळी : सायबर भामट्यांकढून वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना गंडा घालून रक्कम पळविण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात अनेकांची फसवणूक होत असल्याची आकडेवारी दर्शवत आहे. सांगे आणि कुंकळ्ळी येथे घडलेल्या दोन घटनांत मिळून सुमारे २ लाख ५३ हजार ८९० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

सांगे येथे एस. मास्कारेन्हस या महिलेची क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याच्या नावाखाली १.४७ लाखांची फसवणूक करण्यात आली.  मास्कारेन्हस यांना २८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. संबंधिताने आपण एसबीआयच्या क्रेडिट कार्ड विभागातून  बोलत असल्याचे सांगितले.  त्यांच्या क्रेडिट कार्डची मर्यादा २ लाख १४ हजारांवरून ३ लाख १४ हजार रुपये करण्यात येणार असल्याचे सांगितले. फोन करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने त्याच्या सांगण्यावरून ओटीपी शेअर केला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून १ लाख ४७ हजार २०० रुपये वजा झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सांगे पोलीस स्थानकाचे  पीएसआय कृष्णदीप बोरकर करीत आहेत.

ओएनजीसीमध्ये नोकरी देण्याचे आमिष; १.०६ लाखांची फसवणूक 

दुसऱ्या घटनेत सारझोरा येथील एफ. फर्नांडिस यांची नोकरीचे आमिष दाखवून १ लाख ६ हजार ६९० रुपयांची फसवणूक करण्यात आली.  वृत्तपत्रातील विविध पदांच्या नोकरीच्या जाहिराती पाहिल्यानंतर तक्रारदाराने दिलेल्या संकेतस्थळावर आपला ई-मेल आयडी आणि व्हॉट्सअॅप क्रमांक नोंदवला. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने फोन करून आपण ओएनजीसीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले.

नोकरी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत संबंधिताने तक्रारदाराला पैसे भरण्यास प्रवृत्त केले. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने विविध ऑनलाईन व्यवहारांद्वारे आरोपीच्या खात्यांवर एकूण १ लाख ६ हजार ६९० रुपये वर्ग केले.  नंतर हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास पीएसआय आदित्य सावंत करीत आहेत.

नाग‌रिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घ्यावी

नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा पैसे देताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा