मॅसेच्युसेट्स: अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्यातील ॲक्टन शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय वंशाच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने स्वतःची आई आणि १४ वर्षांच्या लहान भावाची निर्घृण हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे अमेरिकेतील भारतीय समुदायासह जगभरात तीव्र खळबळ उडाली असून, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) गैरवापराचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही भयंकर घटना ॲक्टन येथील मार्था लेन परिसरातील राहत्या घरी घडली. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुलांचा खाजगी ट्यूटर नेहमीप्रमाणे त्यांना शिकवण्यासाठी घरी आला होता. मात्र, घराला बाहेरून कुलूप असल्याचे दिसून आल्याने त्यांनी तात्काळ अर्जुनाच्या वडिलांशी संपर्क साधला. वडिलांनी कुटुंबाशी फोनवरून संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय बळावल्याने त्यांनी स्थानिक पोलिसांना घरात जाऊन 'वेल-बीइंग चेक' म्हणजेच कुटुंबाच्या सुरक्षेची पाहणी करण्याची विनंती केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घरात प्रवेश केला. तपासादरम्यान पहिल्या मजल्यावर १४ वर्षांचा सिद्धार्थ आणि तळघरात आई सुधा अत्यंत रक्ताळलेल्या अवस्थेत मृत आढळले. दोघांच्याही शरीरावर धारदार शस्त्राने केलेल्या गंभीर आणि प्राणघातक जखमा आढळून आल्या.
हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपी मुलगा अर्जुन हा आईची होंडा ॲकॉर्ड कार घेऊन घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी संपूर्ण शहरात तात्काळ नाकेबंदी आणि शोधमोहीम राबवून बुधवारी पहाटे वेलँड परिसरातील एका पार्किंग लॉटमधून त्याला कारसह ताब्यात घेतले. मिडलसेक्स काउंटी जिल्हा ॲटर्नी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान आरोपीच्या इंटरनेट वापराबाबत अत्यंत अस्वस्थ करणारा खुलासा झाला आहे. आरोपी मुलगा गेल्या काही दिवसांपासून 'चॅटजीपीटी' सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर स्वतःच्या कुटुंबाला मारण्याबाबतच्या काल्पनिक कथा, विचार आणि गॉथिक कादंबऱ्यांसारख्या भयानक हिंसक संकल्पना सर्च करत होता. ॲक्टन-बॉक्सबरो प्रादेशिक हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या आरोपीवर हत्येचे दोन गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार आणि विनापरवाना वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


