राज्यसभेत 'शुद्धिकरणा'च्या मुद्द्यावरून तीव्र संताप; खर्गे आक्रमक, नड्डांकडून चौकशीचे आश्वासन

उत्तराखंडमधील सभेनंतर मंचाचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'शुद्धिकरण' केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत केला; यावर भाजपचा अशा कृत्याशी संबंध नसून प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन जेपी नड्डा यांनी दिले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
राज्यसभेत 'शुद्धिकरणा'च्या मुद्द्यावरून तीव्र संताप; खर्गे आक्रमक, नड्डांकडून चौकशीचे आश्वासन

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्यसभेत एका संवेदनशील मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे आयोजित सभेमध्ये भाषण केल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन  खर्गे  यांच्या मंचाचे भाजप कार्यकर्त्यांकडून 'शुद्धिकरण' करण्यात आल्याचा गंभीर आरोप खरगे यांनी स्वतः राज्यसभेत केला. या घटनेमुळे आपण दलित असल्यामुळेच असा भेदभाव केला जात असल्याचा आक्रमक सवाल उपस्थित करत त्यांनी सभागृहात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर मल्लिकार्जुन  खर्गे  यांची जाहीर सभा पार पडली होती. या सभेत त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले होते. मात्र, खरगे निघून गेल्यानंतर काही लोकांनी त्या मंचावर जाऊन हवन आणि पूजा करून मंचाचे 'शुद्धिकरण' केल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणाचे पडसाद थेट संसदेत उमटले. राज्यसभेत बोलताना खरगे म्हणाले की, त्यांनी कोणत्याही धर्माचा किंवा समाजाचा अपमान केला नसून केवळ लोकहिताचे मुद्दे मांडले होते. तरीही अशा प्रकारे कृत्य घडणे ही लोकशाहीची विटंबना असून ही घटना अत्यंत वेदनादायी आहे.

खरगे यांच्या या आरोपानंतर सभागृहातील राजकीय वातावरण तापले. यावर उत्तर देताना सभागृह नेते आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले. भाजपचा अशा प्रकारच्या कोणत्याही संकुचित विचारांशी किंवा कृत्याशी संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  खर्गे यांच्या भावना दुखावल्या जाणे हे संपूर्ण सभागृहासाठी खेदजनक असल्याचे सांगत, भाजपने अशा गोष्टींचे कधीही समर्थन केले नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नड्डा यांनी दिले.

हेही वाचा
सर्व पहा