छत्तीसगडमधील धमतरी येथे राष्ट्रीय महामार्ग ३० वर घडलेल्या एका भीषण रस्ते अपघातात मुंबईतील २४ वर्षीय महिला बायकर रिद्धी ठक्कर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बस्तरच्या प्रवासादरम्यान भरधाव ट्रेलराने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडला. अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात ट्रेलराच्या चालकाविरोधात धमतरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवली पश्चिम भागात वास्तव्यास असलेली रिद्धी ठक्कर ही आपल्या २२ ते २३ महिला बायकर्सच्या समूहासोबत मुंबईहून छत्तीसगडमधील बस्तर परिसराच्या सहलीसाठी निघाली होती. बुधवारी भल्या पहाटे सहाच्या सुमारास हा समूह धमतरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३० वरील मरकाटोला घाटाजवळून जात होता. याच दरम्यान एका भरधाव ट्रेलराने रिद्धीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेची तीव्रता प्रचंड असल्याने रिद्धी महामार्गावर दूर फेकली गेली आणि तिच्या दुचाकीचे गंभीर नुकसान झाले. अपघात घडल्यानंतर चालक ट्रेलरासह घटनास्थळावरून तातडीने पसार झाला. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी गंभीर जखमी रिद्धीला प्रथम चारमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात हालवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान गंभीर दुखापतींमुळे तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच धमतरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात निष्काळजीपणा आणि अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीच्या आधारे फरार ट्रेलर चालकाचा शोध घेतला जात असून, पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.


