काही कोकणी शिक्षकांना कोकणी लिहिता येत नाही : मुख्यमंत्री

२२२ प्राथमिक शिक्षकांना दिली नियुक्तीपत्रे

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
काही कोकणी शिक्षकांना कोकणी लिहिता येत नाही : मुख्यमंत्री

पणजी : प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचे भविष्य घडवत असतात. काही कोकणी शिक्षकांना कोकणी लिहिता येत नाही.  प्राथमिक शिक्षकांनी चांगल्या दर्जाची कोकणी आणि मराठी लिहिणे, वाचणे, बोलणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

शुक्रवारी कर्मचारी भरती आयोगातर्फे निवड करण्यात आलेल्या २२२ प्राथमिक शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री निळकंठ हळर्णकर, सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक शैलेश झिंगडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याच्या युगात बहुभाषिक असणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विविध भाषा आत्मसात करून त्या मुलांना शिकवाव्यात. प्राथमिक शिक्षक भरतीवेळी काही जणांनी आमच्यावर

मराठी विषयाचे प्रश्न कोकणीत सोडवण्याची सक्ती केल्याचे चुकीचे आरोप केले. मात्र असे करण्यात आलेले नव्हते. भरती परीक्षेत मराठी भाषेची प्रश्नपत्रिका मराठीतून तर कोंकणी भाषेची प्रश्नपत्रिका कोकणीतूनच सोडवण्यात आली आहे. कर्मचारी भरती आयोगामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे.

यामुळे नियमानुसार पात्र उमेदवारांचीच भरती होत आहे. ते म्हणाले, प्राथमिक शाळेच्या मुलांसाठी त्यांचे पहिले शिक्षक हेच खरे आदर्श असतात. मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करणे, एक चांगले व्यक्तिमत्व तयार करण्याचे काम प्राथमिक शिक्षकांचे असते. प्राथमिक शिक्षकांनी मुलांना योग्य आकार देऊन त्यांचे करियर घडवणे आवश्यक आहे. 

इतिहासाची माहिती असेल तरच उज्वल भविष्य 

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती करून द्यावी. कारण इतिहास माहिती असेल तरच भविष्य उज्वल असते. विकसित भारत आणि स्वयंपूर्ण गोवा निर्माण करण्यासाठी चांगले विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.

हेही वाचा
सर्व पहा