AI कॅमेऱ्यांमुळे गोव्यात वाहतुकीला शिस्त : मंत्री मॉविन गुदिन्हो

गोव्यात एआय कॅमेऱ्यांमुळे वाहतुकीला शिस्त लागली असून अपघातांचे प्रमाण घटल्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले. तसेच दाबोळीतील अनुकूल राजकीय वातावरण, पंचायतींची कॅरिंग कॅपॅसिटी आणि आयडीसी वेबसाईट वादावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
AI कॅमेऱ्यांमुळे गोव्यात वाहतुकीला शिस्त : मंत्री मॉविन गुदिन्हो

पणजी : डिजिटल युगात गोव्यातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, हायटेक आणि शिस्तबद्ध बनवण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या धोरणांना मोठे यश मिळताना दिसत आहे. गोव्यात सध्या प्रायोगिक तत्त्वावर (Trial Period) बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक एआय (AI) ट्रॅफिक कॅमेऱ्यांमुळे रस्त्यांवर कमालीची शिस्त आणि सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. यावर आनंद व्यक्त करत राज्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी गोमंतकीय जनता आणि विशेषतः नियमांचे पालन करणाऱ्या तरुण वाहनचालकांचे कौतुक केले आहे. 

कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करताना सुरुवातीला नागरिकांना जुळवून घेण्यास काहीसा वेळ लागणे स्वाभाविक असले, तरीही गोव्यातील वाहनचालकांनी अत्यंत वेगाने या नव्या प्रणालीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पूर्वी जिथे दिवसाला ३० ते ४० हजारांच्या घरात वेगमर्यादा ओलांडणे व नियमांचे उल्लंघन होण्याची प्रकरणे नोंदवली जात होती, ती संख्या आता घटून अवघ्या काही शेकड्यांवर आली आहे. गाड्यांच्या वेगावर (Speeding) नियंत्रण आल्यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण अत्यंत कमी पातळीवर आणण्यास मोठी मदत होईल, असा ठाम विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला. सध्या ही संपूर्ण प्रणाली चाचणीच्या टप्प्यात असून सार्वजनिक बांधकाम खात्याने (PWD) नियुक्त केलेल्या विशेष संस्थांच्या माध्यमातून जंक्शन सिग्नल्स आणि कॅमेऱ्यांच्या कामकाजाचे सातत्याने बारकाईने संनियंत्रण (Monitoring) केले जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

वाहतुकीतील या आधुनिक बदलांसोबतच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मंत्री माविन गुदिन्हो यांनी दाबोळी मतदारसंघातील स्थिती आपल्यासाठी पूर्णपणे अनुकूल असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून या काळात राबवलेल्या विकासकामांच्या जोरावर यंदाची निवडणूक आपल्यासाठी सुरळीत आणि बिनधोक असेल, असे त्यांनी नमूद केले. नुकत्याच पार पडलेल्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मतदारसंघातील तरुणाईसह सर्वच नागरिकांनी दाखवलेले अभूतपूर्व प्रेम, आपुलकी आणि गर्दी हीच आपल्या कामाची खरी पोचपावती असल्याचे ते म्हणाले. कोणत्याही आग्रहाशिवाय किंवा निमंत्रणाशिवाय जनतेने स्वतःहून येऊन दिलेला हा पाठिंबा आपल्यासाठी भावूक करणारा आणि अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. दाबोळीतील जनतेच्या या अखंड विश्वासापुढे आपण नेहमीच नतमस्तक राहू, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

गोव्याच्या पर्यावरणाचा समतोल राखत ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी पंचायत क्षेत्रातील 'कॅरिंग कॅपॅसिटी' (धारण क्षमता) हा एक अत्यंत गंभीर आणि धोरणात्मक विषय ठरत आहे. पंचायत मंत्री या नात्याने बोलताना माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक गावातील जमीन, पर्यावरण, रस्ते आणि उपलब्ध पायाभूत सुविधांची एक विशिष्ट मर्यादा असते. या क्षमतेचा विचार करूनच भविष्यातील विकासाचे नियोजन करणे काळाची गरज बनले आहे. या विषयावर राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने आणि अभ्यासू वृत्तीने काम करत आहे. विविध पंचायतींच्या कार्यक्षेत्रात धारण क्षमतेचे नियम कशा प्रकारे लागू करायचे याबाबत सखोल विचारमंथन केले जात असून ग्रामीण गोव्याचे मूळ सौंदर्य जपतानाच शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी योग्य वेळ आल्यावर सरकार यावर ठोस निर्णय जाहीर करेल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

दरम्यान, गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या (IDC) वेबसाईट निर्मितीच्या खर्चावरून आणि नव्या लोगोवरून निर्माण झालेल्या वादावर उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रशासनाची बाजू मांडली आहे. या विषयाशी संबंधित सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आणि खरी माहिती जनतेसमोर ठेवण्यासाठी उद्या एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आयडीसीच्या वेबसाईट निर्मितीमध्ये किंवा निविदा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झालेला नसून सर्व अधिकृत सरकारी नियमांचे व प्रक्रियेचे (Procedure) काटेकोरपणे पालन झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील सर्व तांत्रिक व प्रशासकीय तपशील अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आले असून बैठकीत त्यावर चर्चा झाली आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेतून पारदर्शकता समोर ठेवून सर्व तथ्यांचा खुलासा केला जाईल, असे आश्वासन शेवटी त्यांनी दिले.

हेही वाचा
सर्व पहा