पर्तगाळी जीवोत्तम मठात रंगला ‘भक्तिमहोत्सव’ कार्यक्रम

ऋषिकेश, गार्गी यांची मैफल : गोवन वार्ता, कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th August, 09:38 pm
पर्तगाळी जीवोत्तम मठात रंगला ‘भक्तिमहोत्सव’ कार्यक्रम

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ येथे परमपूज्य श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांच्या चातुर्मास व्रतोत्सवानिमित्त गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी ‘भक्तिमहोत्सव’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘गोवन वार्ता’, ‘प्रुडंट मीडिया नेटवर्क’ आणि ‘गोवा कला व संस्कृती खाते’ यांच्या संयुक्त विद्यमाने या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिरसात रंगलेल्या या सुवर्णसंध्येला मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती लाभली.

सुरेल गायनाने रंगली सांगीतिक मैफल

भक्तिमहोत्सवात ऋषिकेश साने आणि गार्गी सिद्धये यांच्या सुरेल गायनाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यांना हार्मोनियमवर धनराज मडकईकर, तबल्यावर रुद्राक्ष वझे, पखवाजवर केदार धामणस्कर, तर ताल आणि रिदमवर गोविंद गावठणकर यांनी साथसंगत केली. भक्तिगीतांच्या या मैफलीचा उपस्थितांनी मनमुराद आनंद घेतला.

डॉ. गोविंद भगत यांनी विविध जिवंत आणि प्राचीन उदाहरणांचा संदर्भ देत कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. त्यांच्या निवेदनाला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

दहावा चातुर्मास व्रतोत्सवकाणकोण येथील मठात ५ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत स्वामीजींचा दहावा चातुर्मास व्रतोत्सव साजरा होत आहे. या काळात दैनंदिन त्रिकाल पूजा आणि तप्त मुद्राधारणा समारंभ सुरू आहेत.

चातुर्मास व्रतोत्सवाचे औचित्य साधून भक्तिमहोत्सवाचे आयोजन करण्याची संधी मिळाल्याचे चातुर्मास समितीचे अध्यक्ष अनिल पै यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सांगितले.

कलाकार आणि मान्यवरांचा सत्कार

कार्यक्रमाच्या प्रारंभी चातुर्मास समितीचे अध्यक्ष अनिल पै यांनी सर्व कलाकारांचे फुले देऊन स्वागत केले. ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर यांच्या हस्ते अनिल पै यांचा सत्कार करण्यात आला. भक्तिमहोत्सवाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल अनिल पै यांनीही पांडुरंग गावकर यांना प्रेमाचे प्रतीक म्हणून फुले देऊन त्यांचे स्वागत केले.

हा भक्तिमहोत्सव आतापर्यंतच्या सर्वोत्तम कार्यक्रमांपैकी एक असून, या सांगीतिक मेजवानीचा मनसोक्त आनंद घेतल्याचे कलाकार मोहनदास कामत यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य

चातुर्मास समितीचे सदस्य शिरीष पै यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन ‘गोवन वार्ता’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र पाटील यांनी केले. तसेच केशव तळवडेकर, लक्ष्मीकांत बाळ्ळीकर, दुर्गेश, नैनेश, कैलास नाईक आणि तुळशीदास चारी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले.

हेही वाचा
सर्व पहा