बोगमाळो-वास्को येथून ८ लाखांचा रोड रोलर चोरीला

अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
39 mins ago
बोगमाळो-वास्को येथून ८ लाखांचा रोड रोलर चोरीला

वास्को : चिकोळणा-बोगमाळो येथे रस्त्याच्या कडेला उभा करून ठेवलेला सुमारे ८ लाख रुपये किमतीचा रोड रोलर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी वास्को पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

कुंकळ्ळी येथील रहिवासी सूरज फळदेसाई यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मालकीचा रोड रोलर चिकोळणा-बोगमाळो येथे रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. अज्ञात व्यक्तीने हायड्रा क्रेन आणि ट्रेलरच्या मदतीने हा अवजड रोड रोलर तेथून नेल्याचा संशय आहे. बुधवारी (१२ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

रोड रोलर जागेवर नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर फळदेसाई यांनी वास्को पोलिसांकडे तक्रार केली.  त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदवला.

पोलिसांकडून चोरीच्या घटनेचा तपास सुरू आहे.  रोड रोलर नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या हायड्रा क्रेन आणि ट्रेलरचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून संशयितांची ओळख पटवण्याचे कामही केले जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मुरगावचे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक I प्लेटो कार्व्हालो करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा