वास्को : कुंठ्ठाळी येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी अखेर मार्गी लागली आहे. स्मशानभूमीच्या दुरुस्ती कामाची पायाभरणी गुरुवारी करण्यात आली.
कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांच्याहस्ते दुरुस्ती कामाची पायाभरणी करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य मर्सियाना वाझ, कुठ्ठाळीच्या सरपंच उज्वला राजेश नाईक, दक्षिण गोवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (DRDA) प्रकल्प संचालक संगीता एस. नाईक यांच्यासह संबंधित अधिकारी आणि स्थानिक उपस्थित होते.
ग्रामीण विकास विभाग आणि दक्षिण गोवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून हे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. स्मशानभूमीतील विद्यमान सुविधांमध्ये सुधारणा करून स्थानिक नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि व्यवस्थित सुविधा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याची माहिती आमदार वाझ यांनी दिली. स्मशानभूमीच्या दुरुस्तीची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. अखेर कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


