पणजी : गोवा पोलीस संयमी आहेत. मात्र काही लोक याचा चुकीचा अर्थ काढून गैरफायदा घेत आहेत. पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. यापुढे असले कोणतेही प्रकार सहन केले जाणार नाहीत. अशा प्रकरणात कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार पोलिसांना दिले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
शुक्रवारी गोवा पोलीस दलाला वाहने देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक आलोक कुमार, पोलीस महानिरीक्षक के आर चौरासिया व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा लहान राज्य असल्याने पोलीस तसेच लोक एकामेकांना चांगलेच ओळखतात. आपल्या ओळखीच्या आपल्या भागातील लोकांना सहसा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील असतात. मूळ गोमंतकीय स्वभावानुसार आमचे पोलीस देखील संयमी आहेत. मात्र कुणीही याचा चुकीचा अर्थ काढू नये. यापुढे पोलिसांना कठोर कारवाई करायची असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा असेल. लोकांची सुरक्षा करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र कुणी पोलिसांवर अरेरावी करत असेल तर ते सहन करून घेऊ नका. अशा प्रकरणात पोलीस काय करू शकतात हे दाखवून द्यायची वेळ आली आहे.
ते म्हणाले, राज्य सरकार पोलिसांना अद्ययावत करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. यानुसार पोलिसांना विविध उपकरणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील एक भाग म्हणून आज पोलिसांना ४६ बीट वाहने देण्यात आली आहेत. ही वाहने पत्रादेवी ते काणकोण दरम्यान; महामार्गावर तैनात करण्यात येतील. याद्वारे महामार्गांवरील अपघात कमी करणे तसेच येथील सुरक्षा वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. मागील काही वर्षांत गोवा पोलिसांचा प्रतिसादाचा वेळ कमी होऊन नऊ मिनिटे झाला आहे. यापुढे तो सहा मिनिटांवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
१७ उपनिरीक्षकांना दिली नियुक्ती पत्रे
यावेळी कर्मचारी भरती आयोगातर्फे भरती करण्यात आलेल्या १७ पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी नवनियुक्त पोलिसांनी आपली नियुक्ती जनतेची सेवा करण्यासाठी झाली आहे हे लक्षात ठेवावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्मचारी भरती आयोगामुळे भरती प्रक्रिया पारदर्शक झाल्याचे त्यांनी सांगितले.


