सांगे : सांगे पोलीस स्थानकात पोलिसांशी हुज्जत घालून दमदाटी केल्याप्रकरणी पोलिसांनी
गोवा फॉरवर्ड पक्षाचे स्थानिक नेते मॅश्यू डिकॉस्टा यांच्यासहीत इतरांवर अजामीनपात्र गुन्हे नोंद केले आहेत. याप्रकरणी पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र, ते पोलिसांना सापडत नाहीत. पोलिसांना दमदाटी करण्याच्या या प्रकाराची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही गंभीर दखल घेतली आहे. असे प्रकार सहन केले जाणार नसून, कारवाई करण्यासाठी पोलिसांना पू्र्ण मोकळीक दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
गुन्हे नोंदवण्यात आलेल्यांत मॅश्यू डिकॉस्टा यांच्यासहीत दत्तराज राऊत देसाई, अॅड. विराज नागवेकर यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हे नोंदवले आहेत. मॅश्यू यांच्या निवासस्थानी पोलिसांनी शोध घेतला. मात्र, सापडू शकला नाही. घराच्या परिसरात पोलीस पहारा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास केला जात आहे.
पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत : मुख्यमंत्री
पोलिसांवर हल्ला किंवा पोलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या किंवा त्यांच्यावर हात उचलणाऱ्या व्यक्तींविरोधात कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना कठोरपणे कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहे. दोषींवर कोणतीही नरमाई दाखवली जाणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा आणणाऱ्या किंवा त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा संदेश मुख्यमंत्री सावंत यांनी दिला आहे.


