पणजी : अस्नोडा येथील पार नदीत कचरा आणि दूषित सांडपाणी सोडल्याचा आरोप ‘क्लब महिंद्रा रिसॉर्ट’ व्यवस्थापनाने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. काही ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य नसून, रिसॉर्ट सर्व पर्यावरणपूरक नियमांचे काटेकोर पालन करत असल्याचे क्लब महिंद्राने स्पष्ट केले आहे.
रिसॉर्ट व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य खात्याच्या पथकाने नुकतीच क्लब महिंद्रा रिसॉर्टची स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनाबाबत सविस्तर पाहणी केली होती. या तपासणीदरम्यान कोणतीही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर गोष्ट आढळून आलेली नाही, असा दावा रिसॉर्ट प्रशासनाने केला आहे.
अस्नोडा येथील पार नदीत जवळील रिसॉर्टमधून कचरा व दूषित पाणी सोडले जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत गोवा मानवाधिकार आयोगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, सार्वजनिक बांधकाम (पिण्याचे पाणी) खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता आणि रिसॉर्टच्या व्यवस्थापकांना नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर महिंद्रा रिसॉर्टने हे स्पष्टीकरण जारी केले आहे.
नियमांचे पालन करत असल्याचा दावा
कचरा आणि सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जे पर्यावरणीय नियम लागू आहेत, त्या सर्व नियमांचे रिसॉर्टद्वारे तंतोतंत पालन केले जाते. रिसॉर्टमधील सर्व यंत्रणांची नियमितपणे तपासणी केली जाते. त्यामुळे चुकीच्या आणि तथ्यहीन तक्रारींच्या आधारेच मानवाधिकार आयोगाकडून ही नोटीस जारी करण्यात आली आहे, असा दावा महिंद्रा रिसॉर्ट प्रशासनाने केला आहे.


