होंडा येथे ५ लाखांच्या गांजासह ओडिशाचे दोन तरुण वाळपई पोलिसांच्या जाळ्यात

वाळपई पोलिसांनी होंडा येथील औद्योगिक वसाहतीमधील बायपास रस्त्यावर धाड टाकून ५.०९१ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी ओडिसातील बंसीधर हंस आणि विकासचंद्र हंस यांना अटक करून गुन्हा नोंदवला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
13 mins ago
होंडा येथे ५ लाखांच्या गांजासह ओडिशाचे दोन तरुण वाळपई पोलिसांच्या जाळ्यात

पणजी सत्तरी तालुक्यातील होंडा येथील औद्योगिक वसाहतीमधील बायपास रस्त्यावर वाळपई पोलिसांनी अमली पदार्थविरोधी धडक कारवाई करत ५.०९१ किलो गांजा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे पाच लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी ओडिसा येथील दोन तरुणांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे.

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून रचला सापळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसुर्ले औद्योगिक वसाहती जवळील बायपास रस्त्यावरून काही जण अमली पदार्थांची वाहतूक करणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खुशाली नाईक, पोलिस कॉन्स्टेबल आकाश ठाकूर, महेंद्र गावस , गौरांग माजिक, गौरांग वायंगणकर, सुलेश नाईक आणि जितेंद्र ठाणेकर यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. संशयास्पदरित्या वावरणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या पाठीवरील बॅगेत ५.०९१ किलो गांजा आढळून आला.

बंशीधर ब्रह्मा हंस (वय २८) विकासचंद्र सच्चिदानंद हंस (वय २५ दोघेही रा. तरंजा, कालाहांडी, ओडिशा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोन्ही संशयितांविरुद्ध वाळपई पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(b)(ii)(B) आणि २९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश मडकईकर, डिचोलीच्या उपअधीक्षक  श्रीदेवी बी. व्ही.  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाळपईचे निरीक्षक विद्याधर पिळगावकर यांच्या नेतृत्त्वाखाली उपनिरीक्षक खुशाली नाईक या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.



हेही वाचा
सर्व पहा