राज्यस्तरीय नीट यूजी समुपदेशनाची पहिली फेरी १३ ऑगस्टपासून सुरू

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (NEET-UG 2026) प्रवेशासाठी ऑल इंडिया कोटा आणि राज्य कोट्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार राज्य कोट्याची पहिली प्रवेश फेरी १३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
38 mins ago
राज्यस्तरीय नीट यूजी समुपदेशनाची पहिली फेरी १३ ऑगस्टपासून सुरू

पणजी : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (NEET-UG 2026) प्रवेशासाठी ऑल इंडिया कोटा आणि राज्य कोट्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार राज्य कोट्याची पहिली प्रवेश फेरी १३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. देशभरातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (एमबीबीएस, बीडीएस इत्यादी) प्रवेशाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) आणि राज्य प्रवेश प्राधिकरणांमार्फत पार पडणाऱ्या 'नीट-यूजी २०२६' (NEET-UG 2026) च्या ऑल इंडिया कोटा आणि राज्य कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी ऑल इंडिया कोट्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, तर राज्य कोट्यासाठी १३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. एकूण चार टप्प्यांत पार पडणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत ऑल इंडिया कोटा आणि डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी ४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान समुपदेशन प्रक्रिया चालणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल.  राज्य कोट्यासाठी १३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान पहिली फेरी पार पडणार असून २८ ऑगस्ट ही प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुसऱ्या फेरीत ऑल इंडिया कोट्यासाठी २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान समुपदेशन होईल आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांना ८ सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयात हजर राहावे लागेल. राज्य कोट्यासाठी ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान समुपदेशन प्रक्रिया चालणार असून, १४ सप्टेंबर ही प्रवेश निश्चित करण्याची शेवटची मुदत असेल.

तिसऱ्या फेरीत ऑल इंडिया कोट्यासाठी १० सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान प्रक्रिया पार पडून २६ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित केले जातील, तर राज्य कोट्यासाठी १६ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर दरम्यान ही फेरी पार पडून १ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश दिले जातील. सर्वात शेवटी उर्वरित जागांसाठी 'स्ट्रे व्हॅकन्सी' फेरी आयोजित केली जाईल. यात ऑल इंडिया कोट्याची फेरी २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान, तर राज्य कोट्याची फेरी ३ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान होईल. या दोन्ही कोट्यांतर्गत या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.

 अभ्यासक्रमांचे नवीन शैक्षणिक वर्ष ८ सप्टेंबर २०२६ पासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. तसेच, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया वेळेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी सर्व सहभागी वैद्यकीय संस्था आणि महाविद्यालयांना शनिवार, रविवार आणि इतर सर्व सरकारी सुट्ट्यांच्या दिवशीही प्रवेशाचे कामकाज सुरू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.


हेही वाचा
सर्व पहा