सत्तरी: अडवई येथील ग्रामस्थांनी गावाचे मूळ अस्तित्व, पारंपरिक संस्कृती आणि निसर्गसंपदा जपण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गावातील पाचही वाड्यांतील रहिवाशांनी एकत्र येत स्थानिक श्री शांतादुर्गा मंदिरात एकमुखाने संकल्प केला की, गावातील एक इंच जमीनसुद्धा कोणत्याही परप्रांतीय व्यक्तीला विकली जाणार नाही.
गोव्यात सध्या परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी सुरू असून, यामुळे गावांचे मूळ अस्तित्व, संस्कृती आणि स्थानिक रहिवाशांचे हक्क धोक्यात येत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. गावातील जमिनींची विक्री रोखून संस्कृतीचे व निसर्गाचे जतन करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे गावकऱ्यांनी स्पष्ट केले.
जर कोणाला गरजेपोटी जमिनीचा व्यवहार करायचाच असेल, तर तो व्यवहार गावातल्या गावात किंवा स्वतःच्या नातेवाईक-आप्तस्वकीयांमध्येच केला जाईल. परंतु, कोणत्याही परिस्थितीत परक्या किंवा बाहेरील व्यक्तीला जमीन हस्तांतरित केली जाणार नाही, यावर सर्वांचे एकमत झाले. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पारंपरिक रीतीरिवाजांनुसार आणि धार्मिक श्रद्धेने या निर्णयावर एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.


