धर्मापूर सिर्ली ग्रामसभेत एनडीए, कलम ३९ एला विरोध

शाब्दीक वाद हातघाईवर पोहचल्यानंतर सभा गुंडाळली

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
02nd August, 11:37 pm
धर्मापूर सिर्ली ग्रामसभेत एनडीए, कलम ३९ एला विरोध

मडगाव : धर्मापूर सिर्ली ग्रामसभेत रविवारी नगर नियोजन कायद्याच्या कलम ३९ एच्या अंमलबजावणीला व नो डेव्हलपमेंट एरिया या संकल्पनेलाही नागरिकांनी सर्वानुमते विरोध दर्शवला. नगरनियोजन खात्याचा हा कायदा फेटाळून लावत स्थानिकांनी प्रादेशिक आराखड्याला पाठिंबा देण्याचा ठराव घेण्यात आला. दरम्यान, गावातील एका प्लॉटच्या मुद्द्यावरुन शाब्दीक वाद हातघाईवर पोहचल्यानंतर ही सभा संपविण्यात आली.

धर्मापूर सिर्ली पंचायतीची ग्रामसभा रविवारी सरपंच अविता परेरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामसभेला वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनीही उपस्थिती दर्शवली होती. नगरनियोजन खात्याच्या कलम ३९ ए या कायद्यामुळे बेकायदेशीर जमीन रुपांतरण आणि बेसुमार बांधकामांना खतपाणी घातले जाते.

सिर्ली गावातील १२ लाख १० हजार चौमी तर धर्मापूर गावात १६ लाख ५८ हजार चौमी जागा ३९ ए अंतर्गत रुपांतरास घालण्यात आली होती. या कायद्यामुळे गावातील पर्यावरणाला धोका निर्माण होत असून मूळ ओळख नष्ट होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या कलमाअंतर्गत पंचायतीकडे येणार्‍या एकाही प्रस्तावाला सहमती दिली जाऊ नये, अशी मागणी स्थानिकांनी केली. गावातील पर्यावरण, डोंगर, नद्या व इतर संसाधने संवर्धनासाठी स्थानिकांच्या सूचना व हरकतींतून तयार केलेला २००९ चा प्रादेशिक आराखडा लागू करावा, अशी भूमिका स्थानिकांकडून घेण्यात आली.

भूखंडाच्या खरेदी विक्रीवरून वाद

ग्रामसभेत एका भूखंडाच्या खरेदी विक्री आणि बिल्डरच्या हस्तक्षेपावरून ग्रामसभेत शाब्दीक वाद सुरु झाला व त्याचवेळी एका व्यक्तीने हात उगारल्यानंतर झटापट झाली. यामुळे ग्रामसभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, हा वाद आपापसात मिटवण्यात आला. यानंतर ही ग्रामसभा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा
सर्व पहा