'५१०० रुपये पाठवलेत!' 'यायला वेळ नाही' म्हणत तिन्ही लेकींनी लावली बापाच्या अंत्यविधीला ऑनलाइन हजेरी

मुंबईतील कापड व्यावसायिक शिवचरण गुप्ता यांचे सोनीपत येथील वृद्धाश्रमात निधन झाले, मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या तिन्ही मुलींनी ५,१०० रुपये ऑनलाईन पाठवून वडिलांचे अंतिम संस्कार व्हिडिओ कॉलद्वारे प्रत्यक्ष पाहून निरोप दिला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
'५१०० रुपये पाठवलेत!' 'यायला वेळ नाही' म्हणत तिन्ही लेकींनी लावली बापाच्या अंत्यविधीला ऑनलाइन हजेरी

मुंबई : हरियाणातील सोनीपत येथील एका वृद्धाश्रमात घडलेल्या एका घटनेने आधुनिक काळातील कौटुंबिक मूल्ये, ज्येष्ठ नागरिकांची काळजी आणि बदलत चाललेल्या सामाजिक नात्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एकेकाळी मुंबईतील कापडाचे नामांकित व्यापारी म्हणून ओळखले जाणारे ७४ वर्षीय शिवचरण रामरतन गुप्ता यांचे सोनीपत येथील वृद्धाश्रमात निधन झाले. मात्र, अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे त्यांच्या अंतिम विधीसाठी मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या तिन्ही मुली प्रत्यक्ष हजर राहू शकल्या नाहीत. त्यांनी वडिलांच्या अंत्यसंस्काराचा विधी थेट व्हिडिओ कॉलद्वारे पाहूनच निरोप दिला.



शिवचरण गुप्ता हे गेल्या तीन वर्षांपासून सोनीपत येथील एका वृद्धाश्रमात वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीसुद्धा याच वृद्धाश्रमात राहत होत्या आणि सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले होते. आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी पडलेल्या गुप्ता यांनी वृद्धाश्रमाच्या छत्राखालीच आपले उर्वरित आयुष्य व्यतीत केले. त्यांच्या निधनानंतर वृद्धाश्रम व्यवस्थापनाने मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या मुलींशी तातडीने संपर्क साधला. वडिलांच्या निधनाची माहिती देऊन अंत्यसंस्काराच्या नियोजनाबाबत विचारणा केली असता, मुलींनी पार्थिव मुंबईत आणण्याऐवजी सोनीपतमध्येच अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. यासाठी त्यांनी अंत्यसंस्काराचा खर्च म्हणून ५,१०० रुपये ऑनलाईन पद्धतीने वृद्धाश्रमाच्या खात्यावर वर्ग केले.


Sonipat Old Age Home: Daughters Skip Father Funeral, Watch Via Video Call


अंत्यसंस्काराचे विधी कोणी आणि कसे करावेत असा प्रश्न निर्माण झाला असता, मुलींनी हा संपूर्ण अंत्यसंस्कार विधी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याची विनंती केली. वृद्धाश्रमाचे संचालक आनंद कुमार यांनी स्वतः या सर्व व्यवस्थेची जबाबदारी घेतली आणि मोबाईलवर व्हिडिओ कॉल सुरू करून ऑनलाईन संपर्क प्रस्थापित केला. व्हिडिओ कॉल सुरू झाल्यावर जेव्हा एका मुलीने मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्या मृत वडिलांचा चेहरा पाहिला, तेव्हा तिच्या तोंडून केवळ 'बाबा' असा शब्द बाहेर पडला. त्यानंतर अंतिम विधी पार पडत असताना ती मुलगी संपूर्ण वेळ ऑनलाईन जोडलेली होती.


Daughters Attend Father's Funeral Through Video Call, Pay ₹5,100 for Last  Rites Sonipat, August 6: A heartbreaking incident from Haryana's Sonipat  has sparked widespread debate on social media after three daughters attended


अंतिम विधी सुरू असताना मुलीकडून सातत्याने विधी पूर्ण होण्याच्या वेळेबाबत विचारणा केली जात होती. प्रक्रिया सुरू झाली असून आणखी १० ते १५ मिनिटांत ती पूर्ण होईल, असे सांगण्यात आल्यानंतर, सर्व विधी पूर्ण झाल्यावर त्याचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. तसेच, वडिलांच्या अस्थी २० तारखेपूर्वी घेऊन जाण्याची विनंती वृद्धाश्रम प्रशासनाने केली असता, त्यापूर्वी येणे शक्य होईल का हे पाहू, असे उत्तर सर्वात धाकट्या मुलीकडून देण्यात आले.


Sonipat Old Age Home: Daughters Skip Father Funeral, Watch Via Video Call


तंत्रज्ञानाने जग जवळ आणले असले, तरी मानवी संवेदना आणि प्रत्यक्ष सहवासाची जागा ते घेऊ शकत नाही, हेच या घटनेने अधोरेखित केले आहे. एका नामांकित व्यापाऱ्याचा अशा प्रकारे वृद्धाश्रमात झालेला अंत आणि व्हिडिओ कॉलवरून पार पडलेले अंतिम संस्कार हे आधुनिक जीवनशैलीतील विभक्त कुटुंब पद्धती, व्यस्तता आणि एकाकी पडणाऱ्या वृद्धांच्या सामाजिक सुरक्षेच्या प्रश्नावर भाष्य करतात. ही घटना केवळ एका कुटुंबाची नसून, आजच्या धावपळीच्या युगात आटत चाललेल्या मानवी नात्यांच्या स्नेहाचा आरसा दाखवणारी ठरली आहे.

हेही वाचा
सर्व पहा