‘भक्तिमहोत्सवा’त न्हावेलीतील रसिक चिंब

प्रुडंट नेटवर्क, ‘गोवन वार्ता’तर्फे गोवा कला व संस्कृती खाते यांच्या सहकार्याने साखळी मतदारसंघातील न्हावेली गावातील आकर्षक अशा श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रांगणात आयोजित ‘भक्तिमहोत्सवा’त रसिक प्रेक्षक चिंब झाले. बाहेर पावसाच्या श्रावणधारा बरसत असतानाच मंदिराच्या प्रांगणात सुरांची बरसात गोमंतकातील प्रसिद्ध गायक कलाकार अक्षय नाईक आणि गौतमी हेदे यांनी केली. सिद्धी उपाध्ये यांच्या रसाळ सूत्रनिवेदनाने या मैफलीत जान आणली.


14th August, 11:26 pm
‘भक्तिमहोत्सवा’त न्हावेलीतील रसिक चिंब

न्हावेली-साखळी येथील कार्यक्रमात साथी कलाकरांसोबत गायन सादर करताना अक्षय नाईक व गौतमी हेदे. (कैलास नाईक)
गोवन वार्ता वार्ताहर
साखळी : प्रुडंट नेटवर्क, ‘गोवन वार्ता’तर्फे गोवा कला व संस्कृती खाते यांच्या सहकार्याने साखळी मतदारसंघातील न्हावेली गावातील आकर्षक अशा श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रांगणात आयोजित ‘भक्तिमहोत्सवा’त रसिक प्रेक्षक चिंब झाले. बाहेर पावसाच्या श्रावणधारा बरसत असतानाच मंदिराच्या प्रांगणात सुरांची बरसात गोमंतकातील प्रसिद्ध गायक कलाकार अक्षय नाईक आणि गौतमी हेदे यांनी केली. सिद्धी उपाध्ये यांच्या रसाळ सूत्रनिवेदनाने या मैफलीत जान आणली.
या ‘भक्तीमहोत्सव, भक्तीगीतांची सुवर्ण सायंकाळ’ या मैफलीला न्हावेली साखळीत चांगलाच प्रतिसाद लाभला. ‘प्रथम तुला वंदीतो..’ या गणेशवंदना गीताने सुरुवात झालेल्या या मैफलीत गायक कलाकार अक्षय नाईक व गौतमी हेदे यांनी एकापेक्षा एक सरस व भक्तीरसात श्रोत्यांना चिंब भिजविणारी भक्तिगीते सादर केली. मैफलीला उपस्थित रसिकांनी कार्यक्रम संपेपर्यंत आपली जागा सोडली नाही, हेच या संगीतमय सायंकाळचे खरे वैशिष्ट्य ठरले.


कार्यक्रमाला उपस्थित दै. ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर, डीजीएम (महसूल) रवींद्र पाटील व  रसिक श्रोते.
या मैफलीत श्री लक्ष्मीनारायण देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्वंभर गावस यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच कलाकारांचाही सन्मान करण्यात आला. देवस्थान समितीतर्फे खास या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या संगीत मैफलीत तबल्यावर रोहित बांदोडकर, की-बोर्डवर विष्णू शिरोडकर, पखवाजवर गौरव पिंगुळकर, ताल व रिदमवर प्रकाश आमोणकर यांनी साथसंगत केली. श्रावण मास सुरू झाल्यानंतर न्हावेली गावात आयोजित या संगीत मैफलीमुळे देवस्थान परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते. यावेळी उपस्थित रसिकांनीही चांगलाच प्रतिसाद देत कलाकारांना प्रोत्साहन दिले. याच जोरावर ही मैफल अधिकच बहरत गेली.       

हेही वाचा
सर्व पहा