मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बैठकीपूर्वीच प्रदेश काँग्रेसला धक्का; १०८ बूथ एजंट्सचे तडकाफडकी राजीनामे

गोव्यात प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बैठकीपूर्वीच १०८ बूथ लेव्हल एजंट्सनी (BLA-2) मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. पक्षाचे नेते आणि तळागाळात प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते यांच्यात समन्वय नसल्याची प्रतिक्रिया वाळपईचे बीएलए पिनो यांनी दिली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
17 mins ago
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बैठकीपूर्वीच प्रदेश काँग्रेसला धक्का; १०८ बूथ एजंट्सचे तडकाफडकी राजीनामे

पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष आणि मतभेद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. पक्षाच्या सुमारे १०८ बूथ लेव्हल एजंट्सनी (BLA-2) आपापल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोपवले आहेत. पक्षाच्या निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी तसेच बूथ व ब्लॉक स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित राष्ट्रीय अध्यक्षांच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वीच तळागाळातील कार्यकर्त्यांनी हे आक्रमक पाऊल उचलल्यामुळे प्रदेश काँग्रेस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रदेश काँग्रेस नेतृत्वाकडून स्थानिक कार्यकर्त्यांना सातत्याने दुर्लक्षित केले जाणे, योग्य संवादाचा अभाव आणि निर्णयप्रक्रियेत विश्वासात न घेण्याची वृत्ती या राजीनाम्यांमागे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेषतः वाळपई मतदारसंघातील बूथ लेव्हल एजंट्सनी पक्षातील सद्यस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याचा दौरा आणि कार्यकत्यांच्या महत्त्वाच्या बैठकीचे नियोजन असतानाही, प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या बूथ एजंट्सना याबाबत कोणतीही पूर्वकल्पना किंवा अधिकृत निमंत्रण देण्यात आले नाही. अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर कोणतेही स्पष्ट नेतृत्व किंवा मार्गदर्शन लाभत नसून, मतदारसंघात पक्षाचा अधिकृत नेता नेमका कोण आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांशी कोणताही समन्वय न साधता परस्पर निर्णय घेतले जात असल्यामुळे आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून सत्ता स्थापन करण्याबाबत काँग्रेस पक्ष खरोखरच गंभीर आहे का, अशी शंका राजीनामा देणाऱ्या एजंट्स पैकी एक अ‍ॅशली पिनो यांनी उपस्थित केली आहे.

दरम्यान, राजीनामा दिलेल्या बूथ लेव्हल एजंट्सनी आपण आजही काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा न देता, केवळ बूथ लेव्हल एजंट (BLA-2) या जबाबदारीवरून माघार घेऊन त्यांनी प्रदेश नेतृत्वाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला आहे. निवडणुकीच्या काळात प्रत्यक्ष बूथ स्तरावर जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचे कठीण काम कार्यकर्तेच करत असतात. अशा परिस्थितीत राबणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य मान-सन्मान आणि निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने त्वरित तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी आणि अडचणी दूर कराव्यात, अशी ठाम भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

हेही वाचा
सर्व पहा