१८९९ ची महासाथ ते सव्वाशे वर्षांची परंपरा: वास्कोच्या प्रसिद्ध 'श्री दामोदर सप्ताहा'ची रंजक गोष्ट!

सन १८९९ मध्ये वास्कोत पसरलेल्या प्लेगच्या साथीवर मात करण्यासाठी जांबावलीहून आणलेल्या श्रीफळाच्या स्थापनेतून श्रीदेव दामोदर भजनी सप्ताहाची सुरुवात झाली, जी आज १२७ वर्षांची ऐतिहासिक व सामाजिक ऐक्य जपणारी परंपरा बनली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
11 mins ago
१८९९ ची महासाथ ते सव्वाशे वर्षांची परंपरा: वास्कोच्या प्रसिद्ध 'श्री दामोदर सप्ताहा'ची रंजक गोष्ट!

गोव्यातील वास्को शहरात दरवर्षी रंगणारा श्री देव दामोदर भजनी सप्ताह हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, तो एका मोठ्या संकटावर श्रद्धेने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. या महोत्सवाच्या मुळाशी जाण्यासाठी १८९९ या सालात डोकावणे गरजेचे ठरते. त्या काळात गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते. राजकीय उलथापालथ, अमानुष वागणूक आणि मंदिरांची होणारी मोडतोड यांमुळे सर्वसामान्य जनता आधीच त्रासातून जात होती. अशा कठीण परिस्थितीत सन् १८९९ मध्ये वास्को आणि संपूर्ण मुरगाव तालुक्यात प्लेगच्या भयंकर महासाथीने थैमान घातले. त्याकाळी पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि दळणवळणाची तोकडी साधने यामुळे प्लेगचा संसर्ग वाऱ्यासारखा पसरला आणि लोक पटापट दगावू लागले. सर्व आशा आणि मार्ग अंधारमय झाले होते. हतबल झालेल्या वास्कोवासीयांवर अत्यंत बिकट संकट ओढवले होते आणि मृत्यूचे सावट शहरावर पसरले होते.

जेव्हा मानवी प्रयत्न अपुरे पडतात, तेव्हा तारणारी दैवी शक्ती जागृत होते, असा विश्वास मानवी संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. वास्कोतील असहाय्य ग्रामस्थांनी अखेर या संकटातून मार्ग काढण्यासाठी जांबावली (मडगाव) येथील श्री देव दामोदर चरणी धाव घेतली. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी जांबावली गाठून देवाला साकडे घातले. तेथे कौलाच्या रूपात देवाची आज्ञा मिळून प्रसादाचा श्रीफळ देण्यात आला आणि या श्रीफळाची वास्कोत स्थापना करण्याचा संदेश देण्यात आला. देवावर अथांग श्रद्धा ठेवून ते भक्तगण वाजतगाजत आणि पायी चालत जांबावलीहून वास्कोत पोहोचले. मात्र, वास्कोत पोहोचल्यानंतर आणलेला पवित्र श्रीफळ सुस्थितीत कुठे स्थापित करायचा, असा प्रश्न उभा राहिला. अशा वेळी गावातील अनंत जोशी यांनी पुढे येऊन आपल्या कौलारू वाड्याची साल पडवी या धार्मिक कार्यासाठी उपलब्ध करून दिली. अत्यंत भक्तीभावाने त्या ठिकाणी श्रीफळाची स्थापना करण्यात आली. या स्थापनेनंतर वास्कोतील प्लेगची भयंकर साथ वेगाने ओसरू लागली आणि मृत्यूचे तांडव थांबले. या दैवी प्रचितीमुळे वास्कोवासीयांची देवावरील निष्ठा अधिकच दृढ झाली आणि या चमत्कारिक घटनेतूनच ऐतिहासिक वास्को सप्ताहाच्या परंपरेचा जन्म झाला.

या श्रीफळाची आणि श्रीदेव दामोदराची नित्य सेवा करण्याची ऐतिहासिक जबाबदारी जोशी पुरोहित घराण्यावर आली, जी आज अविरतपणे १२६ हून अधिक वर्षे पार पाडली जात आहे. जोशी घराण्याच्या सेवेचा इतिहास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. सुरुवातीच्या काळात श्रीधर जोशी हे वास्को हार्बर भागात एका छोट्याशा झोपडीवजा घरात वास्तव्यास होते. त्यांनी कर्नाटकातील हलियाळ येथून आपले चुलत बंधू विनायक ऊर्फ बाबू जोशी यांना गोव्यात आणले. बाबू जोशी यांचे वडील लहानपणीच वारल्यामुळे कुटुंबावर प्रचंड हलाखीची परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे बाबू जोशी, राजाकाका आणि द्वारका या भावंडांना श्रीधर जोशी यांनी आपल्यासोबत वास्को हार्बर येथे आश्रय दिला. ही भावंडे गावात माधुकरी मागून, मूठभर तांदूळ आणि कळशीभर पाण्याचे निवळ पिऊन अत्यंत साधेपणाने उदरनिर्वाह करत असत.

अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही बाबू जोशी यांनी श्रीदेव दामोदराची सेवा करण्यास प्रारंभ केला. सुरुवातीच्या काळात कधी दिव्यात तेल-वात असायची, तर कधी केवळ एक फूल आणि पाणी अर्पण करून दामबाबाची पूजाअर्चा केली जायची. परंतु, त्यांची अपार भक्ती, निष्ठा आणि सात्त्विक वृत्ती यामुळे त्या सेवाकार्यात आनंद नांदत होता. कालांतराने बाबू जोशी यांचा विवाह झाला, वंशाचा विस्तार झाला आणि हार्बर येथील जागा अपुरी पडू लागल्याने त्यांनी वास्कोतील बेलाबाय परिसरात गृहस्थाश्रमाची मेढ रोवली. आज प्रशांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली जोशी घराण्याची चौथी पिढी या जागृत देवाच्या नित्यसेवेचा आणि सप्ताहातील मुख्य विधींचा वारसा अत्यंत निष्ठेने पुढे चालवत आहे.

इतर भागांत साजऱ्या होणाऱ्या सप्ताहांच्या तुलनेत वास्कोच्या सप्ताहाचे स्वरूप आणि रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा मुख्य भजनी सप्ताह २४ तासांचा असतो. दरवर्षी श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच श्रावण शुद्ध षष्ठीला दुपारी या सप्ताहाची अधिकृत सुरुवात होते. सप्ताहाच्या मुख्य आयोजनापूर्वी आदल्या वर्षी स्थापित केलेला पवित्र श्रीफळ विधीवत रीतीने समुद्रात विसर्जित केला जातो. त्यानंतर वास्कोतील एका निश्चित बागेतील विशिष्ट झाडावरून आणलेला नवीन श्रीफळ जोशी घराण्याच्या देवघरात आणून, देवाला साकडे घालून त्याची स्थापना केली जाते. हा श्रीफळ स्थापित होताच सप्ताहाचा २४ तासांचा अखंड भजनांचा सोहळा सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सांगतेच्या विधीने त्याची समाप्ती होते.

वास्को सप्ताहाची सर्वात मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक ताकद म्हणजे 'पारां'ची परंपरा होय. सप्ताहाच्या सुरुवातीच्या काळातच समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी व्यावसायिक आणि सामाजिक निकषांवर भजनांच्या वेळा (पार) वाटून देण्यात आल्या होत्या. यामध्ये नाभिक समाज, ब्राह्मण समाज, बाजारकर समाज, गडेकर समाज यांसारख्या विविध समाजांचा समावेश होता. प्रत्येक समाजाला सप्ताहाच्या २४ तासांत एक ठराविक वेळ दिली जाते. त्या ठरलेल्या वेळेत संबंधित समाजाचे भाविक मंचावर येऊन देवासमोर भजन, अभंग आणि भक्तीसंगीत सादर करतात. या परंपरेमुळे जातीय आणि सामाजिक भिंती गळून पडल्या असून संपूर्ण वास्को शहर या सप्ताहाच्या निमित्ताने एका सूत्रात बांधले जाते.

विशेष म्हणजे या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात आयोजकांनी या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी शासनाकडून कोणतेही थेट आर्थिक अनुदान घेतलेले नाही. वास्कोतील स्थानिक नागरिकांची असीम श्रद्धा, व्यापाऱ्यांचे योगदान आणि स्थानिक स्वयंसेवकांचे अथक परिश्रम यांवरच हा संपूर्ण उत्सव उभा राहतो. अगदी कोरोना महामारीसारख्या अलिकडच्या काळातील भीषण संकटातही, प्रशासकीय नियमांचे पालन करत जोशी घराण्याने सप्ताहाचे मूलभूत धार्मिक विधी खंडित होऊ दिले नाहीत.

धार्मिक विधींसोबतच वास्को सप्ताहाला भव्य सांस्कृतिक आणि शास्त्रीय संगीताच्या महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सप्ताहाच्या काळात शहरातील विविध चौकांत आणि मंचांवर वेगवेगळ्या समित्यांतर्फे आणि स्थानिक उद्योजकांच्या प्रायोजकत्वाखाली देशातील ख्यातनाम शास्त्रीय गायकांच्या मैफिली आयोजित केल्या जातात. विशेषतः नागपंचमीच्या दिवशी आयोजित होणाऱ्या या संगीत मैफिली वास्कोकरांसाठी मोठा सांस्कृतिक सोहळा ठरतात. अशा प्रकारे, प्लेगच्या महासाथीतून जन्मलेला हा सप्ताह आज १२७ वर्षांनंतरही वास्को शहराची सांस्कृतिक ओळख, सामाजिक एकता, अध्यात्मिक तेज आणि लोकसहभागाचे एक अमर प्रतीक म्हणून दिमाखात उभा आहे.

हेही वाचा
सर्व पहा