मादी खेकडे वाचवा, भावी पिढीसाठी सागरी संपदा जपा; मुख्यमंत्र्यांचे मच्छीमारांना आवाहन

गोव्याच्या सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी प्रजननाच्या काळात मादी खेकड्यांचे संवर्धन करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मच्छीमार पेले यांच्याशी संवाद साधताना केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
1 hours ago
मादी खेकडे वाचवा, भावी पिढीसाठी सागरी संपदा जपा; मुख्यमंत्र्यांचे मच्छीमारांना आवाहन

पणजी : गोवा राज्याची ओळख केवळ निसर्गरम्य किनाऱ्यांपुरती मर्यादित नसून, येथील समृद्ध सागरी जैवविविधता आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती हादेखील गोव्याच्या अस्मितेचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, बदलत्या पर्यावरणासोबतच प्रजननाच्या काळात होणाऱ्या अनियंत्रित मासेमारीमुळे राज्यातील सागरी परिसंस्थ समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रजननाच्या काळात मादी खेकड्यांची होणारी शिकार थांबवून सागरी संपदेचे रक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवाहन केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मच्छीमार पेले यांच्याशी संवाद साधून या गंभीर विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले.



सागरी जीवसृष्टीचा समतोल राखण्यात खेकड्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पावसाळ्याच्या दिवसांत मिळणाऱ्या एका मादी खेकड्याच्या पोटात सुमारे आठ लाख अंडी असतात. प्रजननासाठी तयार असलेल्या या अंडीयुक्त मादी खेकड्यांची शिकार केली गेल्यास लाखो नवीन खेकड्यांची निर्मिती प्रक्रिया जागीच थांबते. त्यामुळे समुद्रातील व खाडीतील खेकड्यांची संख्या वेगाने घटण्याची भीती निर्माण झाली आहे. जर अशाच प्रकारे अंडी असलेल्या मादी खेकड्यांची शिकार सुरू राहिली, तर येत्या दहा वर्षांत गोव्यात स्थानिक खेकडे मिळणे कठीण होईल आणि हॉटेल्स व रेस्टॉरंट्समध्ये मिळणाऱ्या पारंपरिक गोवन खाद्यपदार्थांवर याचा थेट परिणाम होईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.


या समस्येवर मात करण्यासाठी मच्छीमारांनी जाळ्यात सापडलेले अंडीधारक मादी खेकडे मारण्याऐवजी त्यांना पुन्हा समुद्रात किंवा नदीच्या पाण्यात सोडून दिले पाहिजे. तसेच आवश्यकता भासल्यास मत्स्यव्यवसाय खात्याकडे सुपूर्द करून त्यांच्या संवर्धनाला चालना दिली पाहिजे. मुख्यमंत्री सावंत यांच्या या आवाहनाला मच्छीमार पेले यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, गोव्यातील पारंपरिक मच्छीमार बांधवांमध्ये याविषयी व्यापक जनजागृती करण्याचे आश्वासन दिले आहे. निसर्गाचा हा अनमोल वारसा आणि सागरी संपदा भावी पिढीसाठी सुरक्षित ठेवणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची व मच्छीमार बांधवाची एकत्रित जबाबदारी आहे.

हेही वाचा
सर्व पहा