पाटणा : बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात जलाभिषेकासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीत अचानक भीषण चेंगराचेंगरी होऊन सात महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना अशोकधाम रेल्वे स्टेशनवरून मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींवर स्थानिक सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सात महिलांपैकी चार जणांची ओळख पटली असून यामध्ये लखीसराय येथील रहिवासी मधुबाला देवी, मनमाला देवी, हेमलता देवी आणि मुंगेर येथील रिंकू देवी यांचा समावेश आहे. या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त करत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृत महिलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मंदिरात जलाभिषेकासाठी पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग मंदिरापासून थेट अशोकधाम रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचली होती. त्याच वेळी स्टेशनवर दोन गाड्या येऊन थांबल्यामुळे प्रवाशांची आणि भाविकांची गर्दी अधिकच वाढली. प्रशासनाकडून पुरुषांची आणि महिलांची स्वतंत्र रांग करण्यात आली होती. अशातच रस्त्यावरील एक खांब अचानक पुरुषांच्या रांगेच्या दिशेने कोसळला.
खांब पडताच उपस्थितांमध्ये घबराट पसरली आणि लोकांवर जिवंत वीजवाहिनी पडल्याची व विजेचा करंट पसरल्याची अफवा वेगाने पसरली. विजेचा धक्का बसण्याच्या भीतीने पुरुष भाविक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. त्यामुळे पुरुषांच्या रांगेतील प्रचंड गर्दीचा दबाव शेजारी असलेल्या महिलांच्या रांगेवर पडला. या प्रचंड दबावामुळे लावण्यात आलेले बॅरिकेड्स तुटले आणि महिला एकमेकींवर कोसळल्या. अवघ्या दोन मिनिटांत ही भीषण घटना घडली.
दुर्घटनेनंतर लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पडलेला खांब हा विजेचा नव्हता, तर त्यावर इंटरनेट आणि डिश टीव्हीची केबल वायर होती. त्यामुळे तेथे कोणताही विजेचा प्रवाह नव्हता. मात्र, जिवंत वीजवाहिनी पडल्याच्या अफवेमुळेच भाविकांमध्ये भीती निर्माण झाली आणि चेंगराचेंगरी घडून आली.
पोलीस आणि प्रशासनाचे पथक पहाटे ३ वाजेपासूनच सुरक्षेसाठी तैनात होते, परंतु अवघ्या दोन मिनिटांत पसरलेल्या अफवेमुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, बिहारमधील धार्मिक स्थळांवर पाच महिन्यांच्या कालावधीत झालेली ही दुसरी मोठी चेंगराचेंगरी आहे. यापूर्वी ३१ मार्च रोजी नालंदा येथील मघरा शीतला देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे मंदिरामधील गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


