सावंतवाडी : आंबोली वन परिमंडळात केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या २२ वर्षीय आश्लेषा सागर मांगले (मूळ रा. आजरा) या युवतीने माडखोल धवडकी येथील आपल्या भाड्याच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
आश्लेषा मांगले या तीन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग वन खात्यात सेवेत रुजू झाल्या होत्या आणि त्यांच्यावर आंबोली वन परिक्षेत्रातील केसरी वनरक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या माडखोल धवडकी येथे पूजा गोवेकर यांच्या घरात भाड्याने राहत होत्या. रविवारी सुट्टी असल्याने आश्लेषा दिवसभर घरातच होत्या. मात्र, उशिरापर्यंत त्या बाहेर न आल्यामुळे घर मालक गोवेकर यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा उघडून आत पाहिले असता आश्लेषा यांनी ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस महेश जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी वनविभागाच्या देवसू येथील अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी घरमालक पूजा गोवेकर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करत आहेत.


