..तर पाकिस्तान भारतावर आधी अण्वस्त्रांचा वापर करू शकतो : प्राध्यापक जिआंग ज्युक्विन यांचा दावा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
..तर पाकिस्तान भारतावर आधी अण्वस्त्रांचा वापर करू शकतो : प्राध्यापक जिआंग ज्युक्विन यांचा  दावा

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील (India-Pakistan) वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अण्वस्त्रांच्या वापराबाबत एका प्राध्यापकाने केलेल्या दाव्याने चर्चेला उधाण आले आहे. चीनमध्ये (China) जन्मलेले कॅनेडियन प्राध्यापक आणि भू-राजकीय विश्लेषक जिआंग ज्युक्विन (Jiang Xueqin) यांनी भविष्यात भारत-पाकिस्तानमध्ये मोठा लष्करी संघर्ष झाल्यास पाकिस्तानकडून प्रथम अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जिआंग यांनी अमेरिका इराण यांच्यामधील युद्धाची भविष्यवाणी वर्तवली होती व ती खरी ठरली होती. त्यामुळे त्यांनी वक्तवलेल्या या भाकिताकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. 

‘घाबरून पाकिस्तान आधी अण्वस्त्र वापरू शकतो’

‘राज शमानी’ यांच्या पॉडकास्टमध्ये अणुयुद्धाच्या शक्यतेवर भाष्य करताना ज्युक्विन यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र नियंत्रण व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, अत्यंत गंभीर परिस्थितीत अण्वस्त्रांचा वापर रोखण्यासाठी आवश्यक असलेली मजबूत नियंत्रण यंत्रणा पाकिस्तानकडे कितपत प्रभावी आहे, हा प्रश्न आहे.

भारतासोबतच्या संघर्षात परिस्थिती हाताबाहेर गेल्यास घाबरून किंवा बचावात्मक भूमिकेतून पाकिस्तान प्रथम अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, असा त्यांचा अंदाज आहे. मात्र, हा त्यांचा विश्लेषणात्मक अंदाज असून पाकिस्तानकडून असा कोणताही अधिकृत इशारा देण्यात आलेला नाही.

भारताच्या ‘नो फर्स्ट यूज’ धोरणाचा उल्लेख

ज्युक्विन यांनी भारताच्या अण्वस्त्र धोरणाचाही उल्लेख केला. भारताने दीर्घकाळापासून ‘नो फर्स्ट यूज’ (NFU) म्हणजे प्रथम अण्वस्त्रांचा वापर न करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान संघर्षात अण्वस्त्रांचा पहिला वापर कोणाकडून होऊ शकतो, यावर त्यांनी पाकिस्तानकडे अधिक लक्ष वेधले.

ट्रम्प यांच्या पुनरागमनाच्या भविष्यवाणीचाही दावा

ज्युक्विन यांच्या या विधानाची चर्चा त्यांच्या पूर्वीच्या भाकितांमुळेही होत आहे. त्यांच्या समर्थकांच्या मते, त्यांनी २०२४ च्या अमेरिकच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनाचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच अमेरिका-इराण संघर्षाबाबतही त्यांनी केलेले विश्लेषण चर्चेत राहिले आहे. मात्र, एखादे राजकीय भाकीत खरे ठरणे म्हणजे भविष्यातील प्रत्येक अंदाज अचूक ठरेल, असे मानता येत नाही. त्यामुळे पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर होण्याचा हा दावा संभाव्यतेवर आधारित विश्लेषण म्हणूनच पाहणे महत्त्वाचे आहे.

अणुयुद्धाचा धोका कायम गंभीर

दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धभूमीवर अण्वस्त्रांचा वापर झालेला नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्याने दोन्ही देशांमधील कोणताही मोठा लष्करी संघर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर चिंतेचा विषय ठरतो. त्यामुळे ज्युक्विन यांच्या विधानामुळे भारत-पाकिस्तान संघर्षात अण्वस्त्रांच्या वापराचा धोका आणि त्यावरील नियंत्रण यंत्रणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.


हेही वाचा
सर्व पहा