बिहार: प्रियकराबरोबर पळून जाऊन लग्न; काही तासांतच १९ वर्षीय नववधूचा मृत्यू

प्रियकराला पोलिसांनी घेतले ताब्यात; इन्स्टाग्रामवरील मैत्रीचे प्रेमात रूपांतर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
बिहार: प्रियकराबरोबर पळून जाऊन लग्न; काही तासांतच १९ वर्षीय नववधूचा मृत्यू

पूर्णिया : इन्स्टाग्रामवरून सुरू झालेल्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता प्रियकरासोबत घरातून पळून गेलेल्या १९ वर्षीय तरुणीचा लग्नाच्या काही तासांतच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बिहारमधील पूर्णिया येथे घडली. मनिषा कुमारी असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर दिलखुश कुमार याला ताब्यात घेतले आहे.

मनिषा ही अररिया जिल्ह्यातील बटरबाडी येथील रहिवासी असून बीएच्या प्रथम वर्षात शिकत होती. गेल्या वर्षभरापासून तिचे २० वर्षीय दिलखुश कुमारसोबत प्रेमसंबंध होते. दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. मनिषाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या तरुणासोबत ठरवले होते. मात्र, या लग्नाला तिचा विरोध होता आणि दिलखुशसोबतच लग्न करण्याची तिची इच्छा होती.

रेल्वे स्टेशनवरच भरला सिंदूर

सोमवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास दिलखुश मनिषाला घेऊन अररियातून निघाला. दुपारी दोघे पूर्णिया जंक्शन रेल्वे स्थानकावर पोहोचले. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सोबत नसताना दिलखुशने स्टेशन परिसरातच मनिषाच्या भांगेत सिंदूर भरून तिला पत्नी म्हणून स्वीकारले. त्यानंतर दोघांनी स्टेशनवरच रात्र घालवली. लग्नाचा फोटोही दिलखुशने त्याच दिवशी संध्याकाळी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यामुळे दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली.

मंदिरात जाताना अचानक प्रकृती बिघडली

लग्नानंतर दोघे रामबाग परिसरातील सिटी काली मंदिरात पूजा करण्यासाठी जात होते. यावेळी प्रचंड उष्णतेमुळे मनिषाला अचानक चक्कर आली आणि तिची प्रकृती बिघडली. दिलखुशने नागरिकांकडून मदत मागून तिला सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, पूर्णिया येथे दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यानच मनिषाचा मृत्यू झाला.

मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट

मनिषा घरातून निघून गेल्यानंतर तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. दरम्यान, इन्स्टाग्रामवरील लग्नाचे फोटो पाहून ते दिलखुशच्या घरीही गेले होते. मात्र, तेथून त्यांना बाहेर काढण्यात आल्याचा आरोप मनिषाच्या भावाने केला आहे.

मनिषाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीय केहाट पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी दिलखुशला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. अररियातून दोघे निघाल्यापासून पूर्णिया जंक्शनपर्यंतचा प्रवास, स्टेशनवरील लग्न आणि त्यानंतर सिटी काली मंदिराजवळ मनिषाची अचानक बिघडलेली प्रकृती या सर्व घटनाक्रमाचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा