नवी दिल्ली : पीकांचे नुकसान होत असल्याचे कारण देत हत्तींच्या नैसर्गिक मार्गांमध्ये अडथळे निर्माण करता येणार नाहीत, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील हत्ती मार्गांच्या संरक्षणावर भर दिला आहे. हत्तींच्या अधिवासांदरम्यान त्यांची नैसर्गिक हालचाल अबाधित राहणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला देशातील हत्ती मार्गांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्वेक्षणात विविध राज्यांमधील हत्ती मार्गांची सद्यस्थिती, त्यांच्यासमोरील अडथळे तसेच ते दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
हत्तींचे कळप लांब पल्ल्याचा प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक हालचालीच्या मार्गात अडथळे निर्माण करता येणार नाहीत. केवळ पिकांचे नुकसान होत आहे म्हणून हत्तींचा मार्ग रोखता येणार नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने हत्तींच्या मार्गांमधून त्यांची हालचाल सुनिश्चित करण्यासाठी अनिवार्य मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र, स्थानिक कारणांमुळे देशातील अनेक हत्ती मार्ग अडवले किंवा बाधित केले जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
हत्ती हुसकावण्यासाठी गर्दी आणि शस्त्रांच्या वापरावर चिंता
सुनावणीदरम्यान हत्तींना मानवी वस्त्या आणि शेतीच्या भागातून हुसकावण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांकडून त्यांचा पाठलाग केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अशा पद्धतीमुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असे न्यायालयाला सांगण्यात आले.
हत्तींच्या नैसर्गिक हालचालीदरम्यान त्यांच्यावर बंदुकीचा वापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच हत्ती हुसकावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘हुल्ला पार्ट्यां’वर बंदी घालण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
यावर आवश्यक उपाययोजना करून त्याची माहिती सविस्तर स्थिती अहवालातून न्यायालयाला देण्याचे निर्देश सरन्यायाधीशांनी दिले.
देशात १५० हत्ती मार्ग
‘भारतीय हत्ती कॉरिडोर्स २०२३’च्या (‘Elephant Corridors of India, 2023’) अहवालानुसार, भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने तयार करण्यात आलेल्या अभ्यासात देशातील हत्ती मार्गांची विभागनिहाय नोंद करण्यात आली आहे. पूर्व-मध्य भारतात ५२, ईशान्य भारतात ४८, दक्षिण भारतात ३२, तर उत्तर भारतात १८ हत्ती मार्ग आहेत.
पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक २६ हत्ती मार्ग आहेत. देशातील हत्तींच्या अधिवासांना जोडणाऱ्या या नेटवर्कमध्ये १९ आंतरराज्यीय आणि भारत-नेपाळला जोडणारे सहा सीमापार हत्ती मार्गही आहेत.
हत्ती मार्ग का महत्त्वाचे?
मानवी वस्ती, शेती आणि विकासकामांमुळे हत्तींचे नैसर्गिक अधिवास अनेक ठिकाणी विभागले गेले आहेत. अशा परिस्थितीत हत्ती मार्ग त्यांच्या विविध अधिवासांना जोडण्याचे काम करतात. या मार्गांमुळे हत्तींची सुरक्षित हालचाल शक्य होते आणि मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासही मदत होते.
‘प्रोजेक्ट एलिफंट’ अंतर्गत देशातील १४ हत्ती-व्याप्त राज्यांमध्ये हत्ती मार्ग ओळखून त्यांना मान्यता देण्यात आली आहे. या मार्गांचे संरक्षण करणे हत्तींच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांमधून पुन्हा अधोरेखित झाले आहे.


