पणजी : मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ताफ्यावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हा उघडपणे गुंडगिरीचा प्रकार होता. याबाबत आम्ही दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप याबाबत एफआयआर दाखल झालेली नाही. वेळेत एफआयआर दाखल न झाल्यास आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेस (Congress Party) प्रवक्ता अमित पालेकर यांनी सांगितले.
बुधवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अर्चित नाईक प्रतीक्षा खलप व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पालेकर यांनी सांगितले की, खर्गे हे विरोधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच राज्यसभेचे विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. असे असतानाही त्यांचावर हल्ला होणे यातूनच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात अशा संवेदनशील ठिकाणी पोलीस तसेच विमानतळ प्राधिकरणाने आंदोलन करण्यास परवानगी कशी दिली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आंदोलन करण्यास, विरोध करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र एखाद्या व्यक्तीच्या ताफ्यावर धावून जाणे, वाहनांवर झेंडे फेकून मारणे, सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करणे असले प्रकार चुकीचे आहेत.
ते म्हणाले, खर्गे यांच्या बाबत भाजयुमोचे तुषार केळकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी अभद्र भाषेचा वापर केला. ८५ वर्षांच्या व्यक्तीवर हल्ला करणे ही गोमंतकीय संस्कृती नक्कीच नाही. भाजयुमो एक गुंडांची संस्था बनली आहे. सामान्य गोमंतकीयांनी अशा संस्थेमध्ये आपल्या मुलांना पाठवायचे का याचा विचार करावा. आम्हाला देखील ‘वंदे मातरम्’ गीताचा आदर आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी या गीताचा अर्थ समजून घ्यावा. मुळात भाजपच ढोंगी देश आणि धर्मप्रेमी आहेत. भाजप सरकारनेच गोव्यातील एक मंदिर रातोरात पाडले होते. याच सरकारच्या काळात राम मंदिराच्या दान पेटीत घोटाळा झाला आहे.
समस्या सोडवण्यासाठी आंदोलन करावे : अर्चित नाईक
अर्चित नाईक म्हणाले की, आम्ही गांधीवादी आहोत. मात्र भाजयुमोने याचा गैरफायदा घेऊ नये. वेळप्रसंगी आम्ही भगतसिंग यांच्या विचारांचे होतो हे त्यांनी लक्षात ठेवावे. राज्यात अनेक समस्या आहेत. त्या विरोधात आंदोलन करण्यासाठी भाजयुमोने पुढे यावे.


