वारखंड-वेलूवाडा येथे वन खात्याकडून मगर जेरबंद; स्थानिकांना दिलासा

वारखंड-वेलूवाडा परिसरात मगरींचा वावर वाढल्याने वन खात्याने स्थानिकांच्या मदतीने सापळा रचून एका मगरीला यशस्विरित्या जाळ्यात पकडले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
19th August, 01:12 pm
वारखंड-वेलूवाडा येथे वन खात्याकडून मगर जेरबंद; स्थानिकांना दिलासा

पेडणे: पेडणे तालुक्यातील वारखंड-वेलूवाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मगरींचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर वन खात्याच्या पेडणे विभागाच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तत्परतेने कारवाई करत एका मगरीला यशस्विरित्या जेरबंद केले.

मिळालेल्या माहितीनुसार, वारखंड-वेलूवाडा भागात दोन ते चार मगरींचा मुक्त वावर असल्याचे स्थानिकांनी पाहिले होते. याविषयीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन वन खात्याने या भागात तात्काळ सापळा रचला.

स्थानिक पंचायत सदस्य सबाजी परब आणि ग्रामस्थांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या या संयुक्त मोहिमेला अखेर यश आले व एक मगर सापळ्यात अडकली. मगरीला सुरक्षितपणे पकडून पुढे नैसर्गिक अधिवासात हलवण्याचे काम सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. मात्र परिसरात इतरही मगरी असल्याची चर्चा असल्याने वन खात्याचे कर्मचारी या भागावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा
सर्व पहा