पणजी : गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी आमदारांकडून १६३ तारांकित आणि ७२० अतारांकित असे एकूण ८८३ प्रश्न प्राप्त झाले आहेत. विधिमंडळ खात्याच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी अधिवेशनाचे समन्स जारी केले आहे. ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर असे केवळ तीन दिवस अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. कालावधी कमी असल्याने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. अधिवेशन किमान १५ दिवसांचे असावे, असे पत्र काँग्रेसने राज्यपालांना दिले आहे. अधिवेशन केवळ तीन दिवसांचे असल्याने खासगी कामकाजासाठी स्वतंत्र दिवस ठेवण्यात आलेला नाही. यावरही विरोधी आमदारांनी आक्षेप घेतला आहे.
अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. दररोजच्या कामकाजात शून्य प्रहरासह किती लक्षवेधी सूचना घेण्यात याव्यात, याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार वीरेश बोरकर, आमदार विजय सरदेसाई आणि आमदार वेंझी व्हिएगस हे कामकाज सल्लागार समितीचे सदस्य आहेत.


