पणजी : निवृत्त सहयोगी प्राध्यापक, अभिनेत्री आणि लेखिका प्रशांती तळपणकर यांना एमईस अभिमानश्री २०२६ पुरस्कार जाहीर झाला आहे. वास्को येथील मुरगाव एज्युकेशन सोसायटीच्या ५५ व्या संस्थापक दिन शनिवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता राज तारा सभागृह, बीबीए ब्लॉक, एमईएस वसंत जोशी कला व वाणिज्य महाविद्यालय, झुआरीनगर येथे साजरा करण्यात येणार आहे. यावेळी त्यांना अभिमानश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात शिक्षण, कला व संस्कृती आणि सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या मुरगाव एज्युकेश सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. प्रशांती तळपणकर यांनी शिक्षण, साहित्य आणि अभिनय क्षेत्रात बहुआयामी योगदान देत आपला विशेष ठसा उमटविला आहे.
एमईएस अभिमानश्री हा सन्मान त्यांच्या मोलाच्या योगदानाची आणि उल्लेखनीय कर्तृत्वाची पावती असल्याचे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्रशांती तळपणकर एमईएस वसंत जोशी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स, झुआरीनगरच्या माजी विद्यार्थीनी आहेत. संस्थेशी असलेले त्यांचे हे नाते या सन्मानाला विशेष महत्त्व प्राप्त करून देते आणि संपूर्ण एमईएस परिवारासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला एसएस धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अॅंड इकॉनॉमिक्स (स्वायत्त) कॉलेजचे प्राचार्य डॉ. मनोज कामत प्रमुख पाहुणे म्हणून तर वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. या प्रसंगी त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन मुरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रो. एम. एस. कामत यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच एम.ई.एस.च्या उपाध्यक्ष सौ. ललिता जोशी, भास्कर नायक आणि प्रशांत जोशी यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे.


