सध्या राज्यातील सर्वाधिक रुग्णांवर उपचार गोवा वैद्यकीय महाविद्यालयातच होतात. अनेक खाजगी इस्पितळे उभी राहिली असली तरी लोक विश्वासाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येतात. पण या इस्पितळाची स्थिती मात्र अत्यंत वाईट आहे. प्रसूती विभागात उंदीर फिरतात. अन्य अनेक वॉर्डमध्ये रुग्णांना स्ट्रेचरवर ठेवले जाते. कॅज्युअल्टीत एवढी गर्दी असते, तरीही तिथे उपचार करण्यासाठी हवा तेवढा वैद्यकीय आणि इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही आणि जास्त खाटाही नाहीत. तिथेही रुग्णांना स्ट्रेचरवर ठेवले जाते. रुग्णांची संख्या एवढी आहे की तिथला कर्मचारीही गोंधळून जातो. अनेक रुग्णांची तक्रार असते की कर्मचारी लक्ष देत नाहीत. त्याशिवाय व्हेंटिलेटर, ऑक्सिजन या साऱ्याच गोष्टींचा कायम तुटवडा असतो. भारतातील आणि आशियातील सर्वांत जुन्या इस्पितळांपैकी एक म्हणून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची ख्याती आहे. गोव्यासह सिंधुदुर्ग, बेळगाव आणि कारवारमधील रुग्ण तर इथेच हक्काने येतात. त्यामुळे हे इस्पितळ विशाल गोमंतकातील रुग्णांच्या उपचारासाठी प्रसिद्ध आहे, असे म्हटले तरी चालेल. पण या इस्पितळात हल्ली तक्रारीच जास्त झाल्या आहेत. मंत्र्यांनी डॉक्टरला फैलावर घेतल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे आता मंत्रीही तिथे जास्त जात नाहीत. मंत्र्यांचा हेतू चांगला होता, पण ज्या पद्धतीने डॉक्टरला अपमानित केले गेले, ती पद्धत काहीशी चुकीची होती. पण त्या साऱ्या गोष्टींचा फटका बसला तो गोमेकॉत जाणाऱ्या रुग्णांना. आता तिथला बराच कर्मचारी वर्ग रुग्णांकडे दुर्लक्ष करतो, कारण ते तक्रारही कोणाकडे करू शकत नाहीत. मंत्री आणि डॉक्टरच्या घटनेनंतर कोणाचाच हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही अशा प्रकारची तरतूदच डॉक्टरांनी करून घेतल्यामुळे आता गोमेकॉकडे सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे वेळेवर डॉक्टर येत नाहीत, कनिष्ठ डॉक्टरांच्या भरवशावर इस्पितळ सोडले आहे, अशा प्रकारच्या तक्रारी तिथून ऐकायला येतात. इथे उपचारास जाणाऱ्या बहुतांश रुग्णांना भयानक अनुभव येतात. शौचालयांची स्थिती तर अत्यंत दयनीय आहे. येथील शौचालयांपेक्षा सार्वजनिक शौचालयांची स्थिती बरी असते. रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तारखा दिल्या जातात. त्या बदलल्या तर त्याची माहिती रुग्ण इस्पितळात येऊन, रांगेत उभा राहून संबंधित विभागात पोचेपर्यंत त्याला कोणीच कळवत नाही की शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. एकदा-दोनदा नव्हे, तर चार-पाच वेळा शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याचा अनुभव अनेक रुग्णांना येतो. एवढे मोठे आणि चांगले इस्पितळ, पण गेल्या काही वर्षांत या इस्पितळाची दशा फार वाईट झाली आहे. इस्पितळ हे जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून असावे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय सेवा देण्यात पुढे आहे का आणि रुग्णांना चांगली सेवा मिळते का, याचे ऑडिट व्हायला हवे.
गोमेकॉचा परिसर आता पंचतारांकित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ते तारांकित नसले तरी चालेल, पण लोकांना सुविधा मिळाव्यात एवढीच अपेक्षा असते. औषधे उपलब्ध नसून ती बाहेरून विकत घ्यावी लागतात; यासाठीच तिथे खाजगी औषधालय सुरू करण्यात आले आहे, अशाही तक्रारी आहेत. या गोष्टींकडे गेल्या सात-आठ वर्षांत लक्ष दिलेले नाही. कॅन्सरचे रुग्ण गोमेकॉत येण्यासाठी प्रतीक्षेत असतात, पण त्यांना नाइलाजाने खाजगी इस्पितळांमध्ये जावे लागते. ती व्यवस्था सरकारी इस्पितळात युद्ध पातळीवर व्हायला हवी, याचे भान सरकारला नाही. म्हापसा आणि मडगावमधील जिल्हा इस्पितळांची एवढी वाईट स्थिती आहे की तिथे आलेला रुग्ण बहुतेकवेळा गोमेकॉत पाठवला जातो. गोमेकॉची क्षमता काय आहे? तिथे इतके रुग्ण तपासले जाऊ शकतात का? तेवढे वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, यंत्रे तिथे आहेत का? याची चौकशीही सरकार करू पाहत नाही. सरकारने नागरिकांना आरोग्य विमा दिला आहे, पण नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये, सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये, उपजिल्हा आणि जिल्हा इस्पितळांमध्ये सुविधा, कर्मचारी यांची वाणवा आहे. सुविधा नसल्यामुळे रुग्णांना गोमेकॉत पाठवले जाते. तिथे मोठमोठ्या इमारती आहेत, पण रुग्णांना जमिनीवर, स्ट्रेचरवर राहावे लागते. आरोग्य क्षेत्रातील ही स्थिती कित्येक वर्षे बदललेली नाही. त्यामुळे सरकारने आरोग्य क्षेत्राचे आरोग्य सुधारण्यावर भर द्यावा.


