सिंहगडावरील माथेफिरू

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर आणि त्यांच्या रक्षणाचा धडा घालून दिला, त्यांच्याच राज्यात आणि त्यांच्याच किल्ल्यावर महिला-मुलींना अपशब्द वापरून मारहाण करणाऱ्या अशा माथेफिरूंना शासनाने धडा शिकवण्याची खरी गरज आहे. ही प्रवृत्ती फोफावणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी.

Story: संपादकीय |
20th August, 10:26 pm
सिंहगडावरील माथेफिरू

पुण्यातल्या सिंहगडावर गेल्याच महिन्यात एक पोस्टर झळकले होते. 'हा किल्ला हिंदूंचा, इथे मुस्लिमांना प्रवेश नाही' असे ते पोस्टर होते. तथाकथित स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्यांनी अक्कल पाजळल्यामुळे ते पोस्टर बरेच वादात आले होते. नंतर तिथल्या वन विभागाने ते पोस्टर तिथून हटवले होते. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्याच दिवशी सिंहगडावर एका शाळकरी मुलीने 'बर्मुडा पँट' घातली म्हणून एका कुटुंबाशी काहीजणांनी हुज्जत घातली आणि त्या कुटुंबाला तसेच अन्य पर्यटकांना मारहाणही केली. 'हिंदू बांधव आर्मी' अशा नावाखालील सात-आठ माथेफिरूंनी हे कृत्य केले होते. असे अनेकजण बेरोजगारीमुळे वैफल्यग्रस्त होऊन हिंदुत्वाचे कंत्राट आपल्यालाच दिल्याचा माज दाखवत फिरत असतात. महाराष्ट्रातच नव्हे देशभर हे प्रकार सुरू आहेत, त्यातूनच गोमांस विकल्याच्या संशयावरून कोणाचीतरी निर्दयीपणे हत्या होते, कोणामुळे शुद्धीकरण केले जाते, हे असेच प्रकार देशात सुरू आहेत. शिक्षण, विकास, रोजगार हे विषय काहीजणांसाठी चिंतेचे राहिलेलेच नाहीत. मानसिक रुग्ण असल्यासारखे काहीजण धर्माचे झेंडे हातात घेऊन बेफाम नाचत असतात आणि त्यात निर्दोष लोकांची होरपळ होते. कधी अशा ढोंगी, पाखंडी आणि मानसिक संतुलन बिघडलेल्यांकडून मारहाण होते, कुठेतरी कमी जातीचे लेबल लावून हत्या होते, तर कुठे धर्मद्रोही ठरवून जिवंत जाळले जाते. सिंहगडावर एका हिंदू कुटुंबाला बेदम मारहाण करणाऱ्या माथेफिरूंनी आपण 'हिंदू बांधव आर्मी'चे कार्यकर्ते आहोत, हे सांगतानाही त्यांना लाज वाटली नाही. धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या आंधळेपणाचाच हा एक प्रकार आहे.

एक जोडपे, त्यांची मुले आणि मित्र असे एक कुटुंब सिंहगडावर फिरायला आले होते. तिथे तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ फोटो काढल्यानंतर गडावर मोकाट फिरणाऱ्या आणि धर्माचे कंत्राट घेतलेल्या एका गटाने त्यांच्याशी हुज्जत घातली. त्या कुटुंबातील एका मुलीने बर्मुडा पँट घातल्यामुळे गडाची शान गेली, असा समज करून घेतलेल्या या माथेफिरूंनी त्या कुटुंबाला मारहाण केली. केवळ त्यांनाच नाही, तर हा प्रकार रोखण्यासाठी मध्ये आलेल्या इतर पर्यटकांनाही मारहाण करण्यात आली. महाराष्ट्र शासन ही खुलेआम चाललेली गुंडगिरी कशी काय खपवून घेते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. गेल्या महिन्यात तिथे मुस्लिमांना उद्देशून पोस्टर लावले होते आणि या महिन्यात कपड्यांवरून लक्ष्य करून कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. हे सगळे पाहता पुरोगामी महाराष्ट्र नेमका कुठल्या मार्गाने चालला आहे, असा प्रश्न पडणेही साहजिक आहे. केवळ एका कुटुंबालाच नव्हे, तर मुलींच्या कपड्यांवरून इतरांनाही ड्रेसकोडची धमकी हे लोक देतात; याचाच अर्थ त्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की, या माथेफिरूंमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. दुसऱ्यांना त्यांच्या कपड्यांवरून धमकावणे आणि संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली लोकांना मारहाण करणे हे कुठल्या धर्माच्या नियमांत बसते? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर आणि त्यांच्या रक्षणाचा धडा घालून दिला, त्यांच्याच राज्यात आणि त्यांच्याच किल्ल्यावर महिला-मुलींना अपशब्द वापरून मारहाण करणाऱ्या अशा माथेफिरूंना शासनाने धडा शिकवण्याची खरी गरज आहे. ही प्रवृत्ती फोफावणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी. महाराष्ट्रातच नव्हे, तर कुठेच अशा प्रकारची कृती होऊ नये. लोकांनीही अशा गुंडांची दादागिरी सहन करू नये. 

कुठल्याही गोष्टीला काही मर्यादा असतात. त्या मर्यादा ओलांडणाऱ्या समाजकंटकांना रोखण्यासाठी प्रसंगी लोकांनीही त्यांचा योग्य प्रतिकार करणे गरजेचे आहे. आठ-दहा लोक सर्वांना धमकावून वेठीस धरतात, हे पटण्यासारखे नाही. याचाच अर्थ जेव्हा ते आठ-दहा लोक तिथे दादागिरी करत होते, तेव्हा इतरांनी शांत राहण्याची भूमिका घेतली. सर्वांनी तेव्हाच एकी दाखवली असती, तर अशा प्रकारे लोकांना कपड्यांवरून किंवा जाती-धर्मांवरून हिणवण्याची पुढे कोणाची हिंमत झाली नसती. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी व त्यांना वठणीवर आणण्यासाठी समाजाचीही काही जबाबदारी आहे. समाज सजगता दाखवत नाही म्हणूनच असे तथाकथित धर्मरक्षक हैदोस घालतात. या तथाकथित धर्माच्या कंत्राटदारांना वेळेत रोखणे हे समाजाचे कर्तव्य आहे. मग ते कुठल्याही धर्माचे असोत, त्यांना वेळीच रोखले नाही, तर पुढे हेच लोक दंगली पेटवतात आणि समाजात असुरक्षितता निर्माण करतात.