राज्याच्या राजधानीच्या अनेक समस्या आहेत. पोर्तुगीजकालीन वास्तुकला, नदीकाठचे सुंदर परिसर आणि गजबजलेल्या व्यावसायिक केंद्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या पणजीमध्ये आता वाहतूक कोंडीची समस्या उग्र रूप घेत आहे. मुळात कमी लोकसंख्येचा विचार करून बांधलेले पणजीतील रस्ते आता वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे अपुरे पडत आहेत. कॅसिनोंमुळे या समस्येत आणखी भर पडली आहे. अर्थात वाढत्या लोकसंख्येसह वाहतूक कोंडी वाढणार याचा विचार खूप आधीच करणे आवश्यक होते. विशेष करून लोकप्रतिनिधींनी याची जबाबदारी घेणे आवश्यक होते.
रहिवाशी भागात व्यावसायिक आस्थापने नकोत, ही मूलभूत गोष्ट समजून घेणे आवश्यक होते. मात्र लोकप्रतिनिधी असो वा पणजीत वाहने चालवणारे बहुतेक वाहनचालक असोत, सर्वांची 'मला काय त्याचे?' ही प्रवृत्ती याआधीही होती आणि आजही कायम आहे.
राज्यात प्रतिव्यक्ती वाहनांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. एकाच कुटुंबात अनेक गाड्या असणे सामान्य झाले आहे. एवढेच नाही तर हे अभिमानाने सांगितले जाते. मुळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपयशी, खर्चिक असल्याने लोकांना स्वतःची वाहने घ्यावी लागत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू झालेली 'ई-बससेवा' यावर चांगला उपाय आहे. या सेवेची व्याप्ती अधिक वाढली पाहिजे. माफक दरात, शहरात सर्वत्र आणि नियमित बस सेवा सुरू झाल्यास वाहतूक कोंडीला वैतागलेले लोक नक्कीच याचा वापर करतील. पणजी राजधानीचे शहर आणि पर्यटन स्थळ असल्याने येथे दररोज हजारो खाजगी, भाड्याची वाहने, पर्यटकांच्या बस, टॅक्सी , दुचाकी शहरात प्रवेश करतात. दयानंद बांदोडकर मार्ग आणि १८ जून रोड यांसारख्या प्रमुख रस्त्यांवर गर्दीच्या वेळी प्रचंड कोंडी होते. या रस्त्यांवरील कोंडी कमी करण्यासाठी येथे नेहमीच वाहतूक पोलिस तैनात करणे आवश्यक आहे.
शहरातील पोलिसांनी देखील केवळ दुचाकी चालकांना दंड देण्यात समाधान न मानता, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काम केले पाहिजे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात ठिकठिकाणी सिग्नल, कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र प्रमुख रस्ते वगळता, बहुतेक सिग्नल, कॅमेरे बंद आहेत. ही यंत्रणा सुरू केल्यास वाहतूक पोलीस नसणाऱ्या ठिकाणी वाहतूक समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल. 'एआय' कॅमेऱ्यांद्वारे चलन देणे सुरू झाल्यास वाहनचालकांना देखील शिस्त येईल. शहरातील पार्किंगच्या सुविधांचा अभावामुळे वाहतूक समस्या वाढत आहे. पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसते. असली तरी तिथे 'रेंट-ए-कॅब,' 'रेंट-ए-बाईक' पार्क करून जागा अडवली जाते. अनेक महाभाग तर "दोनच मिनिटांत येतो," असे सांगत रस्त्यावर अक्षरशः कुठेही वाहन पार्क करतात. दुहेरी पार्किंग केल्यामुळे आधीच अरुंद असणारे रस्ते अधिकच लहान होऊन वाहतुकीचा खोळंबा होतो. रस्ता आपली खाजगी मालमत्ता आहे असा यांचा गैरसमज झाला आहे. अशा वाहनांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
पणजीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. पाटो आणि कांपाल येथे बहुमजली पार्किंग प्लाझा उभारल्यास बाहेरील वाहने शहराच्या मध्यवर्ती भागात न येता, तिथेच पार्क करता येतील. शहरात डॉन बॉस्कोच्या समोरील सरकारी जागेत मोठा पार्किंग प्रकल्प उभारणे शक्य आहे. असे झाल्यास पणजी बाजार परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. शहरातील काही जुन्या भागात रस्ते रुंदीकरण शक्य नाही. अशा ठिकाणी 'नो पार्किंग क्षेत्र' अथवा केवळ 'पादचारी क्षेत्र' जाहीर करता येईल. मुख्य व्यावसायिक आणि ऐतिहासिक भाग वाहनांसाठी बंद करून केवळ पादचाऱ्यांसाठी खुले करावेत. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल. अॅप-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून चालकांना उपलब्ध पार्किंगची माहिती थेट उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून पार्किंगच्या शोधात फिरणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी टळेल. योग्य नियोजन, सार्वजनिक वाहतूक, स्मार्ट पार्किंग, पादचारी क्षेत्र घोषित करणे, वाहतूक उल्लंघनावर कडक कारवाई करणे अशा उपाययोजना केल्यास पणजीचा ऐतिहासिक वारसा जपून वाहतूक समस्या सोडवता येईल.
- पिनाक कल्लोळी


