पार्थाची आळवणी आणि भगवंताचे औदार्य

भगवंताच्या अगाध कृपेचे आणि भक्तवत्सल्याचे वर्णन करणारा हा प्रसंग अत्यंत भावपूर्ण आहे. अर्जुनाची आळवणी व श्रीकृष्णाचे उचंबळून आलेले प्रेम यातून साकारलेल्या प्रसंगाचे भाषिक व व्याकरणदृष्ट्या विश्लेषण खालीलप्रमाणे केले आहे.

Story: विचारचक्र |
16th August, 08:19 pm
पार्थाची आळवणी आणि भगवंताचे औदार्य

हे देवाधिदेवा, या जगात मोक्ष हा सर्वात दुर्लभ होय. पण तोही तुझी सेवा करतो आणि म्हणून सेवकाचे नाते स्वीकारून तू पाठवशील तिथे तो जातो. ज्या पूतना राक्षसीने आपले विष-स्तन-पान देऊन तुझे प्राण हरण करण्याचा प्रयत्न केला, तिला तू सनकादी ऋषींच्या बरोबरीने सायुज्याचे दान दिलेस. धर्मराजाने केलेल्या राजसूय यज्ञात जे समस्त ऋषिवर्य व राजे-महाराजे आले होते त्यांच्या समक्ष अत्यंत वाईट वाक्यांनी ज्याने तुझी निर्भर्त्सना केली, तो शिशुपाल दंडण्याजोगा असूनही त्याला तू स्व-स्वरूपी स्थान दिलेस. स्वायंभुव मनूचा नातू आणि उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव, त्याला बालपणी सापत्न मातेने बापाच्या मांडीवर बसू न दिल्यामुळे दु:खित व अवमानित होऊन त्याने मधुवनात जाऊन तपश्चर्या आरंभिली. नारदांनी त्याच्यावर अनुग्रह करून त्याला द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश केला. याच्या भक्तीने प्रसन्न होऊन, हे देवा, तू त्याला या विश्वात चंद्र-सूर्यापेक्षाही चांगले स्थान दिलेस.

असे दु:खितांना सढळ हाताने कैवल्य वाटतोस. ते करताना मागेपुढे काही पहात नाहीस.

संसारात आसक्त असलेल्या अजामीळालाही तू मुक्ती दिलीस. (अजामीळ हा आपल्या पत्नीला टाकून एका शूद्र स्त्रीच्या नादी लागलेला कान्यकुब्ज देशातील एक दुराचारी ब्राह्मण. त्याला 'नारायण' नावाच्या आपल्या मुलाचा फार लळा होता. मृत्यूसमयी 'नारायणा' असे म्हणून त्याने मुलाला हाक मारली असता 'नारायण' नामोच्चाराच्या प्रभावामुळे विष्णुदूतांनी यमदूतांना त्याच्यावर मृत्युपाश टाकू दिला नाही! त्यांचा संवाद ऐकून तो विरक्त झाला व भगवद्भक्त बनला. त्याचा मृत्यू टळला व अंती तो मोक्षपदाला गेला.)

भृगूऋषींनी तुझ्या वक्षस्थळी लत्ताप्रहार केला तरी तू तो व्रण छातीवर मिरवतोस. (भृगू हे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक ब्रह्मर्षी. ब्रह्मदेव, शंकर व विष्णू या तिघांत श्रेष्ठ कोण याबद्दल ऋषींमध्ये वाद होऊन भृगूंना परीक्षा करण्यास पाठवावे असे ठरले. ब्रह्मदेव व शंकर यांच्याकडे जाऊन त्यांनी अपमानकारक वर्तन केले तेव्हा त्या दोघांनाही क्रोध आला. नंतर ते विष्णूकडे गेले. विष्णू झोपलेला असल्यामुळे भृगूंनी त्याच्या वक्षस्थलावर पदाघात करून त्यास उठविले. भगवान विष्णूला मुळीच राग आला नाही. उलट तो त्यांचे पाय आदराने चुरीत राहिला. तेव्हा विष्णूच श्रेष्ठ असा त्यांनी निर्णय दिला. भगवान विष्णूच्या छातीवर भृगूंच्या पदाघाताने उमटलेला व्रण भूषण 'श्रीवत्सचिनन्ह' म्हणून तो मिरवू लागला.)

जो दुष्ट शंखासुर, तो तुझा वैरी असूनही तू त्याचा देह आपल्या हातावर बाळगतोस. (संल्हाद नावाच्या असुराचा पुत्र पंचजन हा शंखरूप धारण करून समुद्रात राहत असे. संदीपनी गुरूचा समुद्रात बुडून मृत झालेला पुत्र परत आणून देत असता कृष्णाने त्याचा वध केला व त्याच्या अस्थींचा एक शंख तयार करून त्यास "पांचजन्य" असे नाव दिले. हा शंख भगवंताच्या हातात सदैव असतो.) अपकारी घटकांवरही तू उपकार करतोसच, पण जे दान देण्यास पात्र नाहीत त्यांनाही उदारत्वाने दान देतोस. 

बळिराजाकडून त्रिपाद भूमीसाठी दान घेतलेस आणि त्याचाच द्वारपाल झालास की नाही? पोपटाला बोलावणाऱ्या गणिकेने तुझी काय भक्ती केली? त्यात तुला तिची कोणती कीर्ती आणि कोणते गुण दिसले? पण तिला तू वैकुंठाला नेलेस. (मिथिला नगरीत पिंगला नावाची एक वेश्या रहात होती. तिने एक पोपट बाळगला होता. ती त्याला कौतुकाने 'राघव' अशी हाक मारीत असे. एके रात्री आपल्या व्यवसायाच्या चिंतनात निमग्न झालेल्या तिला उदासीनता प्राप्त झाली असता तिची दृष्टी पिंजऱ्याकडे गेली व तोंडाने 'राघव' 'राघव' असा उच्चार करता करता तिची वृत्ती अंतर्मुख होऊन ती भगवत्स्वरूपाकडे जी वळली ती तिथून ढळलीच नाही.)

असे बारीकसारीक निमित्त पाहून तू तुझ्या भक्तांना एकाएकी मुक्त करतोस. असा इतका उदार, दयाळू आणि कृपावंत असलेला तू, काय मला दूर लोटशील? जी दुधाचा सुकाळ करून जगाचे संकट निवारते त्या सुरभीची (म्हणजे कामधेनूची) वासरे भुकेली राहिली आहेत असे विपरीत कधी घडलेय काय? म्हणून मला असे वाटते की मी तुला जे काही दाखवण्यासाठी विनंती केली आहे, ते तू मला नक्की लगेच दाखवशील. पण ते तुझे रूप बघायला मला योग्यता मात्र न विसरता दे आणि त्यासाठी माझे हे डोळे समर्थ आहेत असे जर तुला वाटत असेल, तर मात्र ताबडतोब आत्ताच माझे मनोरथ पूर्ण कर.

सुभद्रेचा पती अर्जुन याने अशी यथायोग्य विनंती केल्यावर अशा प्रसंगी त्या षड्गुणांच्या चक्रवर्ती सम्राटाला गप्प कसे राहवेल? कृपेच्या अमृताने ओतप्रोत भरलेला श्रीकृष्णरूपी मेघ आणि त्याच्या सन्निध तो अर्जुनरूपी वर्षाऋतू, जणूं पार्थ हा वसंतऋतू आणि श्रीकांत कोकीळ. पौर्णिमेचा चंद्र पाहून जसा क्षीरसिंधू उचंबळतो, तसा कळकळीने प्रेमाची विनंती करणाऱ्या त्या पार्थाला पाहून त्याच्या प्रेम-बळे तो कृष्ण दुप्पट उल्हसित झाला.

तेव्हा मग त्या उल्हासाच्या आवेशात तो कृपावंत देवकीपुत्र म्हणाला की हे पार्था, मी तुला आता अर्ध्या क्षणात स्वत:ची अनंत रूपे दाखवतो! त्याने एकच विश्वरूप दाखवावे अशी खरे तर अर्जुनाची इच्छा होती. पण या विश्वरूपमय देवाने अवघेच काम मोठे करून ठेवले.


मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३)