४३ लाख लोक मतदारयादीतून वगळले

Story: राज्यरंग |
14th August, 10:23 pm
४३ लाख लोक मतदारयादीतून वगळले

झारखंडमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेअंतर्गत मतदार गणनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या प्रक्रियेदरम्यान ४३.६१ लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली  आहेत.

'एसआयआर' प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राज्यात २ कोटी ६४ लाख ६३ हजार २३६ मतदार नोंदणीकृत होते. गणना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या मसुदा मतदार यादीत २ कोटी २१ लाख १ हजार २४९ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये १ कोटी १२ लाख पुरुष, १ कोटी ८ लाख महिला आणि २६० तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.

२९ जुलैपर्यंत एकूण नोंदणीकृत मतदारांपैकी २ कोटी २१ लाख १ हजार २४९ मतदारांनी आपले गणना प्रपत्र सादर केले. यावरून एसआयआर प्रक्रियेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होते. राज्यात ही मोहीम ३० जूनपासून सुरू झाली होती आणि २९ जुलैपर्यंत चालली. या कालावधीत बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन गणना प्रपत्रांचे वितरण, संकलन आणि पडताळणीचे काम केले.

अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असलेली ४३ लाख ६१ हजार ९८७ मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी सुमारे ७.६३ लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे. १५.९२ लाख मतदार कायमस्वरूपी अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले असून, १४.५० लाख मतदारांचा ठावठिकाणा लागला नाही किंवा ते पडताळणी प्रक्रियेदरम्यान उपलब्ध नव्हते. तसेच ४.३८ लाख मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदलेली असल्याचे आढळले. याशिवाय, सुमारे १.१६ लाख मतदारांनी गणना प्रपत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला किंवा त्यांनी बीएलओकडे आपले प्रपत्र जमा केले नाही.

२०२६ च्या मतदार यादीत नाव असलेल्या परंतु गणना प्रपत्र सादर न केलेल्या कोणत्याही पात्र मतदाराला ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत सुरू असलेल्या ‘दावे आणि हरकती’ प्रक्रियेदरम्यान फॉर्म-६ आणि आवश्यक घोषणापत्र सादर करून पुन्हा मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेता येईल. निवडणूक आयोगाने पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. दावे व हरकतींची छाननी पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

- प्रसन्ना कोचरेकर