काँग्रेसपेक्षा भाजपसमोरच मोठे आव्हान

उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेससमोर जसे आव्हान आहे, किंबहुना त्यापेक्षा मोठे आव्हान भाजपसमोर आहे. त्यातच भाजपमधीलच काही नेते सध्या पक्षाला विश्वासात न घेता इतर मतदारसंघांत हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे काँग्रेसपेक्षा भाजपसमोरच उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हाने निर्माण झाले आहे.

Story: संपादकीय |
13th August, 11:48 pm
काँग्रेसपेक्षा भाजपसमोरच मोठे आव्हान

गोव्यात भाजपात सध्या धुसफूस सुरू झाली आहे. दर निवडणुकीला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांकडून शेवटच्या क्षणी बंडखोरी होते. यावेळी आतापासूनच आपले राजकीय भवितव्य चाचपण्यासाठी सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडे फार आमदार नसल्यामुळे काँग्रेसला विद्यमान आमदारांबाबत फार डोकेदुखीचे काम नसेल. पण त्यांना उमेदवार शोधण्यासाठी बरीच कसरत करावी लागेल. त्यासाठी आतापासूनच भाजपमध्ये दुखावल्या गेलेल्या नेत्यांना आमंत्रण देण्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. उमेदवारांबाबत 'जिंकण्याची क्षमता' हाच सर्व राजकीय पक्षांचा निकष असल्यामुळे चारित्र्य, निष्ठा या गोष्टी त्यांच्यासाठी नाममात्र आहेत. काँग्रेस असो वा भाजप सर्वांनीच यापूर्वीही सर्व नैतिकता बाजूला सारून जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच संधी दिली आहे. यावेळीही तसेच होईल. आदिवासी आरक्षण मिळण्याचे निश्चित होत असल्यामुळे इतर समाजांतील काही नेत्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे; त्यामुळे त्यांच्यात मोठी खदखद निर्माण झाली आहे. तिथूनच एकमेकांच्या मतदारसंघांत घुसखोरी करण्यास सुरुवात होत आहे. ज्यांचे मतदारसंघ आरक्षित होतील, ते आता दुसऱ्या मतदारसंघात आपल्याला संधी आहे का, त्यासाठी चाचपणी करताना दिसत आहेत. तर काही प्रस्थापित आमदारांना एकापेक्षा जास्त मतदारसंघांत आपले अस्तित्व सिद्ध करण्याची इर्ष्या आजही आहे. 

सांताक्रुझमध्ये भाजपचा आमदार असताना, तिथे बाबुश मोन्सेरात यांनी आपले कार्यालय सुरू केले. सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यात कार्यालय सुरू केले. सरकारमध्ये असतानाही दुसऱ्या मतदारसंघात आपली ताकद दाखविण्यासाठी काही आमदारांची धडपड सुरू आहे. भाजप शिस्तीच्या बाता करत असताना त्यांचेच आमदार किंवा त्यांच्या सरकारमध्ये असलेले इतर पक्षाचे आमदार भाजपच्याच मतदारसंघात जाऊन तिथे आपली वेगळी शाखा काढण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र भाजपकडून अशा लोकांना समज दिल्याचे दिसून येत नाही. मात्र भाजपशी प्रामाणिक असलेल्या निष्ठावंतांनी एखादे विधान केले की लगेच त्यांना तंबी दिली जाते. भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसमधून आमदार फोडून पक्ष फुगवण्याचा जो अट्टाहास धरला आहे, तो आता भाजपला जड जात आहे. पण सांगणार कोणाला, अशी भाजपची परिस्थिती आहे. अनेकांनी भाजपच्या आश्रयास राहून आपल्यावरील गुन्ह्यांतून स्वतःची सहीसलामत सुटका करून घेतली. आता तेच लोक भाजपला डोळे वटारत आहेत. मांद्रे, डिचोली, सावर्डे, फोंडा, शिवोलीसारख्या मतदारसंघांत भाजपचा उमेदवार कोण असेल, ते अद्याप भाजपलाही ठरवता आलेले नाही. आदिवासींसाठी राखीव झाल्यास केपे, सांगे, नुवेसारख्या मतदारसंघांमध्येही भाजपसमोर तोच पेच असेल. त्यामुळे उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेससमोर जसे आव्हान आहे, किंबहुना त्यापेक्षा मोठे आव्हान भाजपसमोर आहे. त्यातच भाजपमधीलच काही नेते सध्या पक्षाला विश्वासात न घेता इतर मतदारसंघांत हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे काँग्रेसपेक्षा भाजपसमोरच उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हाने निर्माण झाले आहे. 

काँग्रेसकडे तीन आमदार आहेत. त्यातील एका आमदाराचा मतदारसंघ म्हणजेच केपेची जागा आरक्षित झाली, तर फक्त दोन आमदार राहतात. इतर ठिकाणी युतीतील पक्षांना काही जागा दिल्या, तर अन्य मतदारसंघांत काँग्रेसला उमेदवार शोधावे लागतील. त्यासाठी कोणी निष्ठावान कार्यकर्ता असला म्हणजे त्यालाच उमेदवारी दिली जाईल, असेही नाही. जिंकण्याची क्षमता आहे का, हे काँग्रेसही पाहणार आहे. त्यामुळेच अनेकांनी काँग्रेससोबत बोलणी सुरू केली आहे. सध्याच्या घडीला इतर कोणत्याही विरोधी पक्षाची उमेदवारी घेऊन जिंकणे कठीण दिसत असलेले अनेकजण काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. ज्यात भाजपचेही काही आजी-माजी आमदार आहेत. काँग्रेसने भाजपच्याच आजी-माजी नेत्यांना उमेदवारी दिली आणि त्यातील काही निवडून आलेही तर निवडणुकीनंतर पुन्हा तेच लोक काँग्रेसच्या तोंडाला पाने पुसणार नाहीत, याची मात्र हमी काँग्रेसही देऊ शकत नाही. कारण प्रतिज्ञापत्रे देऊन, देवासमोर शपथा घेऊन यापूर्वीही काँग्रेसच्या आमदारांनी पक्ष विकून भाजपसोबत संसार थाटला. त्यामुळे काँग्रेस पुन्हा अशाच लोकांना संधी देणार असेल, तर काँग्रेसला कोण वाचवू शकतो त्याची हमी कोणीही देऊ शकत नाही. २०१२ पासून काँग्रेसला अनेक नेत्यांनी दगा दिला. यापुढेही काँग्रेसला दगा मिळणार नाही, हे कोणी सांगू शकत नाही. फक्त तो दगा भाजपमध्ये फिरून आलेल्यांनी देऊ नये, असे कदाचित काँग्रेसला वाटत असावे. निवडणूक फेब्रुवारीमध्ये होईल अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे पुढील चार-पाच महिन्यांत अनेक घडामोडी राजकारणात पाहायला मिळतील. भाजप आपल्या लोकांना कशा पद्धतीने रोखते आणि काँग्रेस उमेदवार कुठून आणते, ते पुढील काळात कळेलच.